Virat Kohli Records List : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना खेळण्यापूर्वी, विराट कोहलीने रांचीमध्ये आपला खास मित्र आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीची चर्चा सर्वत्र रंगली होती. या भेटीनंतर अवघ्या दोनच दिवसांत, धोनीच्या शहरात म्हणजेच रांचीच्या मैदानावर, विराट कोहलीने पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावले आणि पुन्हा एकदा सर्वांच लक्ष्य वेधलं. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर 30 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताकडून प्रथम फलंदाजी करताना कोहलीने 38 व्या षटकात, 102 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. धोनीच्या भेटीनंतर लगेचच कोहलीने केलेली ही ऐतिहासिक कामगिरी त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरली आहे. अनेक महिन्यांनंतर कोहलीची ही शतकी खेळी चाहत्यांसाठी खूप खास ठरली, कारण या शतकाने अनेक मोठे विक्रम मोडले, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाचाही समावेश होता. विराटने शतकासह लावली विक्रमांची रांग – सचिनचा मोडला विश्वविक्रम: हे कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील 52 वे शतक आहे. यासह, त्याने एका फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराट ठरला रांचीचा किंग: रांचीच्या मैदानावर कोहलीचे हे तिसरे शतक आहे. त्याने या मैदानावर 5 डावांमध्ये 3 शतके आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने 173 च्या सरासरीने 519 धावा केल्या आहेत. सर्वाधिक ‘3-शतकी’ मैदाने: या शतकामुळे, कोहलीने भारतात तिसऱ्या ठिकाणी 3 शतके झळकावली आहेत (विशाखापट्टणम आणि पुणे येथेही 3-3 शतके). हा विक्रम कोणत्याही फलंदाजासाठी सर्वाधिक आहे. आफ्रिकेविरुद्ध ठोकला शतकाचा षटकार: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक 6 शतके ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकर (5-5) आघाडीवर होते. ऐतिहासिक शतक: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील हे एकूण 7000 वे शतक आहे. भारतीय भूमीवर मोठा विक्रम: भारतीय भूमीवर वनडेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची त्याची ही 59 वी वेळ आहे. त्याने याबाबतीतही सचिन तेंडुलकरचा (58) विक्रम मोडला. हेही वाचा – IND vs SA : हवेत उडी अन् एका हाताने कॅच; डेवॉल्ड ब्रेव्हिसचा क्षेत्ररक्षण पाहून विराट कोहलीही अवाक्! पाहा VIDEO दक्षिण आफ्रिकेला 350 धावांचे लक्ष्य – या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावांचा विशाल डोंगर उभा केला. विराट कोहलीच्या (135 धावा) शानदार शतकी खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. कोहलीने 120 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. त्याला कर्णधार केएल राहुलने 56 चेंडूंमध्ये 60 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. रोहित शर्माने 57 धावा जोडल्या, तर रविंद्र जडेजाने अखेरीस 20 चेंडूत 32 धावा करून धावसंख्या वाढवली. दक्षिण आफ्रिकेकडून बर्गर, बॉश, यान्सेन आणि बार्टमन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.