Virat Kohli Record : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Virat Kohli Record : विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वनडे सामन्या न्यूझीलंडचा ५ विकेट्सनी पराभव केला.

Virat Kohli Historic Milestone 13000 Runs At Number Three In ODI Cricket : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑकलंडच्या ईडन पार्कवर रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ अवघ्या १८५ धावांत गारद झाल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच षटकात रोहित शर्माची विकेट गमावली होती. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या विराटने आपल्या खेळीतील १२ वी धाव पूर्ण करताच, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ नंबरवर १३ हजार धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज बनण्याचा महापराक्रम केला.
सचिन तेंडुलकरनंतर एकाच क्रमांकावर १३ हजार धावा करणारा एकमेव फलंदाज –
क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही एका विशिष्ट फलंदाजी क्रमांकावर खेळताना १३ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट हा सचिन तेंडुलकरनंतरचा जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. सचिनने सलामीला फलंदाजी करताना हा टप्पा गाठला होता, तर विराटने तिसऱ्या क्रमांकावर हा विक्रम नोंदवला. विराटने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तिसऱ्या नंबरवर आतापर्यंत २५४ सामन्यांमधील २५१ डावांत तब्बल ६१ च्या सरासरीने १३००५* धावा फटकावल्या आहेत. या क्रमांकावर १० हजारांचा टप्पा ओलांडणारा रिकी पॉन्टिंग (१२,६६२ धावा) हा एकमेव अन्य फलंदाज आहे.
वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
Sublime touch 🫡
@imVkohli gets to his 80th ODI half-century in just 35 deliveries.
He also becomes the first player to get to 13000 ODI runs, batting at No 3 👏👏
#NZvIND #TeamIndia https://t.co/oiEZiY77r9
— BCCI (@BCCI) November 4, 2026
- विराट कोहली (भारत) – १३,००५* धावा
- रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – १२,६६२ धावा
- कुमार संगकारा (श्रीलंका) – ९,७४७ धावा
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – ७,७७४ धावा
- केन विल्यमसन (न्यूझीलंड) – ६,५०४ धावा
क्षेत्ररक्षणातही जलवा; स्लिपमध्ये टिपला अफलातून झेल
केवळ फलंदाजीतच नव्हे, तर ऑकलंडच्या मैदानात विराटने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणानेही सर्वांची मने जिंकली. युवा गोलंदाज अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या नेथन स्मिथचा दुसऱ्या स्लिपमध्ये विराटने अप्रतिम झेल टिपला. हा झेल पकडल्यानंतर कोहलीचा नेहमीचा आक्रमक आणि उत्साही अंदाज पाहायला मिळाला, ज्यामुळे संपूर्ण भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला होता.





