Virat Kohli Statement : स्वतःला दिलेलं वचन, वर्ल्ड कप जिंकण्याचा निर्धार अन् गिलचे कौतुक; वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी कोहली काय म्हणाला?
Virat Kohli Statement : पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने एक मोठे विधान केले आहे, ज्यामधून त्याने हे स्पष्ट केले आहे की, विश्वचषक जिंकण्यासाठीच त्याचे पूर्ण प्रयत्न असतील.

Virat Kohli Big Statement On Next Year ODI World Cup 2027 Shubman Gill Captaincy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत (ODI World Cup) अत्यंत महत्त्वपूर्ण विधान करत आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विश्वचषकापूर्वी कोहली एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र जिओ हॉटस्टारला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने विश्वचषक खेळण्यासाठी कसून तयारी करत असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, टीम इंडियाचा सध्याचा वनडे कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाचेही कोहलीने तोंडभरून कौतुक केले.
‘तो माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल; जिंकण्यासाठी काहीही करायला तयार!’
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी बोलताना विराट कोहली म्हणाला, “पुढच्या वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक हा भारतासाठी माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल. कोणत्याही परिस्थितीत भारताला तो विश्वचषक जिंकून देणे हेच माझे एकमेव अंतिम उद्दिष्ट आहे, मग त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल.” कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता आपले संपूर्ण लक्ष केवळ या एकाच ध्येयावर केंद्रित असल्याचे त्याने स्पष्ट केले.
स्वतःला दिलेले खास वचन; आता लोकांच्या अपेक्षांची चिंता नाही!
VIRAT KOHLI TALKING ABOUT HIS FINAL WORLD CUP IN 2027. 🥹🇮🇳
“2027 World Cup is going to be the last World Cup I’m going to play for India. That’s my motivation, the goal is absolutely to win the cup, whatever it takes, I’m ready”. (JioStar). pic.twitter.com/fsNBgC1dWj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 26, 2026
आपल्या फलंदाजीच्या शैलीतील बदलांविषयी बोलताना कोहली म्हणाला, “मी स्वतःला एक वचन दिले आहे की, आता मी पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणाने आणि आक्रमक खेळेन. लोक माझ्याकडून काय अपेक्षा ठेवतात, याची चिंता मी आता करत नाही. अनेक वर्षे संघाला सावरून खेळण्याची भूमिका मी निभावली आहे; परंतु आता कठीण खेळपट्टीवर परिस्थितीनुसार संघासाठी विशेष योगदान देण्यावर माझा भर असेल.”
‘शुबमन गिल दीर्घकाळ कर्णधारपद सांभाळेल’; कोहलीकडून कौतुकाची थाप!
कर्णधार शुबमन गिलबाबत बोलताना कोहली म्हणाला की, शुबमन अजून कर्णधारपदाचे बारकावे शिकत आहे. या भूमिकेत तो नवा असला, तरी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेला योग्य दृष्टिकोन आणि प्रबळ इच्छाशक्ती त्याच्याकडे आहे. मैदानातील रणनीतीबाबत त्याचे विचार स्पष्ट असून, अनुभवासोबत तो अधिक परिपक्व होत जाईल. त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे तो दीर्घकाळ भारताचे कर्णधारपद सांभाळेल, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला.





