किर्गिस्थानमध्ये महाराष्ट्रातील ५००हून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती

Kyrgyzstan Violence| किर्गिस्थानमध्ये सध्या हिंसाचार सुरू झाला आहे. यात भारत आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थ्यांकडून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे भारतीय विद्यार्थी मात्र सुखरूप आहेत. मात्र, या हिंसाचारात महाराष्ट्रातील 500 हून विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती आहे. यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थींचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्रातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या महाराष्ट्रातून किर्गिस्थानमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र सध्या येथील हिंसाचाराचे वातावरण पाहता सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
यामध्ये संभाजीनगर, धाराशिव आणि बीड जिल्हातीही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत, त्यातच हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्यानं स्थानिक प्रशासनानं भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, परीक्षेनंतर जुनमध्ये सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
किर्गिस्थानमध्ये का उफाळला हिंसाचार?
दरम्यान, 13 मे रोजी वसतिगृहात राहणाऱ्या काही इजिप्शियन विद्यार्थ्यांचे स्थानिक किर्गिस्थानमधील लोकांशी भांडण झाले होते. यावेळी मारहाणीचा प्रकार देखील घडला. याला स्थानिक लोकांनी विरोध करत भांडण करणारे लोक पाकिस्तानी असल्याचा आरोप केला. त्यामुळे पाकिस्तानी विद्यार्थी किर्गिस्तानच्या लोकांच्या रोषाला सामोरे गेले. या घटनेनंतर शनिवारी रात्री पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. यात हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि लॅपटॉपही चोरून नेले. काही विद्यार्थ्यांना दरवाजा तोडून मारहाणही करण्यात आली.
किर्गिस्तान हे वैद्यकीय अभ्यासासाठी आवडते ठिकाण आहे. सुमारे 12 हजार पाकिस्तानी विद्यार्थी येथे विविध अभ्यासक्रम करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही बिश्केकमधील परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, त्यांनी बिश्केकमधील देशाच्या राजदूताला विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. यात आत्तापर्यंत ४ पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे.
हेही वाचा:
अमेरिकेकडून भारतात राहणाऱ्या मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान ; मोदींच्या कारकिर्दीवरही भाष्य





