मणिपूर – मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. बोरोबेकरा पोलिसांनी सांगितले की, बंडखोरांनी गावात बॉम्बही फेकले. शनिवारी पहाटे ५ वाजता बोरोबेकरा भागातील एका गावात बंडखोरांनी गोळीबार केला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू आहे. सध्या या हल्ल्यात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, बोरोबेकरा हे जिरीबाम शहरापासून ३० किमी दूर आहे. या भागात घनदाट जंगल आणि डोंगर असल्याने याआधीही येथे गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी जिरीबाममधील कालीनगर हमर वेंग भागातील एका शाळेला बंडखोरांनी आग लावली होती. 15 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निमंत्रणावरून मेतेई, कुकी आणि नागा समुदायातील 20 आमदार दिल्लीत पोहोचले होते. त्यांना मणिपूरमध्ये यापुढे हिंसाचार न करण्याची शपथ देण्यात आली. सभेच्या 4 दिवसानंतर शनिवारी जिरीबाममध्ये हिंसाचार झाला. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत प्रथम कुकी, नंतर मेतेई आणि नंतर नागा नेत्यांशी बोलणे झाले. प्रत्येकाने आपल्या मागण्या केंद्रापुढे मांडल्या. यानंतर सर्वांनी एका सभागृहात एकत्र येऊन शपथ घेतली की, आजच्या सभेनंतर मणिपूरमध्ये एकही गोळी चालवली जाणार नाही आणि कोणीही मरणार नाही. याला तिन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली.