Rajya Sabha elections : येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने चार जागांसाठी दोन नावांवर एकमत केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावे केंद्रीय मान्यतेसाठी पाठविण्यात आलेल्या यादीत अग्रस्थानी आहेत, अशी माहिती आहे. इतर संभाव्य उमेदवारांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावांचाही समावेश आहे. मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी दानवे व मुंडे यांच्या नावांचा आग्रह धरण्यात आल्याचे सांगण्यात येते. निवडणूक १६ मार्च रोजी – राज्यसभा निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपुष्टात येत आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ३६ मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेतील बळावर भाजप चार, तर मित्रपक्ष शिवसेना व राकाँप प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणू शकतात. सातवी जागा विरोधी महाविकास आघाडीला (मविआ) मिळणार आहे. बुधवारी रात्री झालेल्या भाजप कोअर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभा निवडणुकीसंदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देणारा एकसूत्री ठराव संमत करण्यात आला. गुरुवारी अनेक इच्छुक उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांनी फडणवीस, राज्य भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गर्दी केली होती. “भाजप जसजसा वाढतो, तसतसे सत्तेत वाटा मिळविण्याच्या इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षाही वाढतात. परंतु जागांची मर्यादा असल्याने सर्वांच्या इच्छा पूर्ण करणे शक्य नाही,” असे पक्षाच्या एका सूत्राने सांगितले. जात व प्रादेशिक समतोलही विचारात घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “केंद्रीय संघटनेतील कामगिरीबद्दल तावडे यांना राज्यसभेचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत दोनदा महत्त्वाची भूमिका बजावली,” असे एका सूत्राने सांगितले. सध्या तावडे निवडणुकाभिमुख केरळसाठी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. २०१४ नंतर आठवले यांना राज्यसभेची जागा देण्यात आली होती. २०१६ मध्ये त्यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री करण्यात आले. २०२० मध्ये त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर संधी मिळाली, जो कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे. हेही वाचा – Todays Top 10 News: महाराष्ट्रात 2000 मराठी शाळा बंद?, NCP अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, सोने-चांदी स्वस्त, Galaxy S26 Ultra लाँच आणि बरंच काही… वाचा आजच्या मोठ्या बातम्या मविआत संभ्रम – विरोधी महाविकास आघाडी एकमेव राज्यसभा जागेच्या उमेदवाराबाबत विभागलेली दिसत आहे. शिवसेना (उबाठा) चे २०, काँग्रेसचे १६ आणि राकाँप (शरद पवार) चे १० आमदार आहेत. “३६ मतांचा आकडा गाठणाऱ्या काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांचा वरचष्मा असणे स्वाभाविक आहे. राज्यसभा जागा काँग्रेसला द्यावी आणि त्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आम्ही सुचविले होते. मात्र शिवसेना (उबाठा) मधील संजय राऊत यांच्या गटाने शरद पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह सोडलेला नाही,” असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ज्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे अशा सात महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यांमध्ये शरद पवार (राकाँप-श.प.), भागवत कराड (भाजप), फौजिया खान (राकाँप-श.प.), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना-उबाठा), धैर्यशील पाटील (भाजप), रजनी पाटील (काँग्रेस) आणि रामदास आठवले (रिपाइं) यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे.