Vinesh Phogat : “काँग्रेसऐवजी भाजपाचा हात धरायला हवा होता”; विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर महावीर फोगाट नाराज, थेट म्हणाले….

Haryana Election । Mahavir Phogat । Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोघेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पोहोचले होते. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हेही खर्गे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश आणि बजरंग आता कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मैदानात दिसणार आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही खेळाडूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना विनेश फोगाट म्हणाली होते, “काँग्रेसने मला त्यांच्या पक्षात प्रवेश दिला यासाठी मी त्यांची ऋणी आहे. काँग्रेसचे मी धन्यवाद देते. मला आज अभिमानास्पद वाटतं आहे. मी अशा एका पक्षात प्रवेश केला आहे जो पक्ष महिलांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे.
जेव्हा आम्हाला रस्त्यावर फरफटत आणि खेचत नेत होते तेव्हा आम्हाला भाजपा सोडून सगळ्या पक्षांनी साथ दिली. आज मी एका नव्या आयुष्याची सुरुवात करते आहे. तसंच महिलांसाठी आम्ही जो आवाज उठवला होता ती लढाई संपणार नाही ती लढाई सुरु राहणार आहे, आम्ही मागे हटणार नाही. असं ती म्हणाली होती. पण तिच्या या निर्णयाने तिचे काका आणि कुस्तीचे गुरू महावीर सिंह फोगाट नाराज झाले असल्याचं दिसून येत आहे.
विनेश फोगाट हरियाणाच्या जुलाना विधानसभेसाठी निवडणूक लढवणार आहे. यासाठी विनेशने बक्ता खेडा गावातून प्रचारला सुरुवातही केली आहे. विनेश बद्दल बोलताना महावीर फोगाट यांनी सांगितलं की, ‘मी तिला कुस्ती सुरु ठेवण्याचं आणि चार वर्षानंतर पुन्हा ऑलिम्पिक लक्ष्य ठेवून तयारी करायला सांगितली होती. पण राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय तिचा स्वत:चा आहे. करिअरच्या प्रवासात राजकारणात सहभागी होणं मला रूचलेलं नाही.’
‘मी राजकारणात सहभागी नाही आणि विनेशचा प्रचारही करणार नाही. जर विनेशला राजकारणात यायचंच होतं तर काँग्रेसऐवजी भाजपाचा हात धरायला हवा होता, असंही ते पुढे म्हणाले. महावीर फोगाट यांची छोटी मुलगी बबीता फोगाट आधीच भाजपाची सदस्य आहे. तिने दादरी विधानसभा जागेसाठी निवडणूक लढवली होती. पण त्यात तिचा पराभव झाला होता.
विनेशने रेल्वेची नोकरी सोडली –
विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतः ही माहिती दिली. याची घोषणा करताना विनेश म्हणाली की, रेल्वेची सेवा करणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की,
माझ्या आयुष्याच्या या वळणावर मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी माझा राजीनामा सुपूर्द केला आहे. देशाच्या सेवेत रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन. असं ती म्हणाली.
विनेशने राजकारणात प्रवेश केल्याने काय होईल?
विनेश फोगटच्या राजकीय प्रवेशामुळे हरियाणाच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. खाप पंचायती आणि शेतकरी यांच्याशी असलेले त्यांचे मजबूत संबंध त्यांना निवडणुकीत मोठा पाठिंबा मिळवू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांची भूमिका हरियाणाच्या राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारी ठरू शकते.
हरियाणात निवडणुका कधी?
हरियाणा विधानसभेची निवडणूक 5 ऑक्टोबरला होणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. याआधी ही तारीख 1 आणि 4 ऑक्टोबर होती पण निवडणूक आयोगाने त्यात बदल केला आहे.





