Vinesh Phogat : विनेश फोगटने निवृत्तीबाबत घेतला यू-टर्न? म्हणाली ‘माझ्यात अजूनही…’

Vinesh Phogat hints at retirement U-turn : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही, विनेश फोगटला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. ती 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत येणार आहे. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी विनेशने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट टाकली असून त्यात तिने तिचा कुस्तीचा प्रवास शेअर केला आहे. या पोस्टमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनेशने पुन्हा एकदा कुस्तीमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.
पुन्हा करणार कुस्ती…
दिल्लीला पोहोचण्यापूर्वी विनेश फोगटने सोशल मीडिया अकाउंट X वर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे; ज्यामध्ये तिने लहानपणापासून ते प्रसिद्ध कुस्तीपटू होण्यापर्यंतची गोष्ट मांडली आहे. तिने लिहिले आहे की, मी एका अत्यंत साध्या कुटुंबातील आहे. माझे वडील बस चालक होते पण त्यांनी मला नेहमीच मोठी स्वप्ने दाखवली आणि त्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मी जे काही आहे ते त्या स्वप्नामुळे आणि धैर्यामुळे.
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 16, 2024
पुढे ती म्हणते की, गेल्या 2 वर्षात माझ्या आयुष्यात मोठे चढ-उतार आले, ज्याचा मी ताकदीने सामना केला, पण मी जे स्वप्न पाहिले आहे ते अजून पूर्ण झालेले नाही. माझ्यात अजूनही कुस्ती करण्याची आणि लढण्याची क्षमता आहे. आता पुढे काय होईल याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण 2032 पर्यंत कुस्ती करू शकते. विनेशच्या या वक्तव्यानंतर ती निवृत्तीचा निर्णय मागे घेत पुन्हा रिंगमध्ये परतू शकते, असे मानले जात आहे. यासोबतच तिने तिच्या पोस्टमध्ये, कुस्ती संघाशी संबंधित अधिकाऱ्यांवर आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यांच्या सतत सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकली नाही. वास्तविक विनेश फोगटला अंतिम फेरी गाठूनही पदक गमवावे लागले होते. विनेश फोगटने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती, मात्र अवघ्या 100 ग्रॅम वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. मात्र, त्यानंतर विनेश फोगट क्रीडा लवादाच्या न्यायालयात पोहोचली, पण तेथेही तिची निराशा झाली.





