Vinesh Phogat : विनेशच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर भूपिंदर हुड्डांचे मोठे वक्तव्य, म्हणाले “खेळाडू हे कोणा एका पक्षाचे….”

Bhupinder Singh Hooda on Vinesh Phogat to Join Congress : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट शुक्रवारी काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. या भेटीचे चित्र समोर येताच विनेश लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत. अशातच आता भुपिंदर हुड्डा यांनीच विनेशच्या राजकारणातील प्रवेशावर मोठा खुलासा केला आहे.
एएनआयशी बोलताना भूपिंदर हुड्डा यांना विचारण्यात आले की, विनेश काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे का? त्यावर उत्तर देताना दिग्गज नेते हुड्डा म्हणाले की, “हा काल्पनिक प्रश्न आहे. खेळाडू हे कोणा एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. पक्षात कोणी सामील झाले तर तुम्हाला कळवले जाईल. ज्याला कोणाला पक्षात यायचे आहे, आम्ही त्याचे स्वागत करू, परंतु हा एक काल्पनिक प्रश्न आहे.”
भूपिंदर हुड्डा पुढे म्हणाले की, “विनेशला काँग्रेसमध्ये यायचे की नाही, हे सर्वस्वी तिच्यावर अवलंबून आहे. आज तिला अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. तिला योग्य तो सन्मान मिळायला हवा, ज्यास ती पात्र आहे.” विनेश फोगटला राज्यसभेची जागा मिळावी, अशी मागणी काँग्रेसने यापूर्वीच केली होती आणि आता हुड्डा यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे.
Cricket : जय शाह ICCचे अध्यक्ष झाले तर BCCI चे सचिव कोण असतील? ‘या’ तिघांची नावे जोरदार चर्चेत…
सचिन तेंडुलकरसारखा सन्मान दिला पाहिजे
भूपिंदर हुड्डा या मुलाखतीदरम्यान म्हणाले की, विनेश फोगटला सुवर्णपदक विजेत्याला जसा सन्मान मिळतो तसाच सन्मान मिळायला हवा. ते पुढे म्हणाले की, “मी याआधीही म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला राज्यसभेची जागा देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचप्रमाणे विनेशलाही उमेदवारी देण्यात यावी. तिच्यावर अन्याय झाला आहे आणि ती पूर्णपणे न्यायास पात्र आहे.”





