Vinayaki Scholarship : उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनायकी’ शिष्यवृत्ती.! जाणून घ्या अर्जाची अंतिम मुदत
स्व. माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनतर्फे सलग चौथ्या वर्षी 'विनायकी : विनायक गौरव शिष्यवृत्ती' उपक्रम राबविण्यात येत आहे.

Vinayaki Scholarship : स्व. माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनतर्फे सलग चौथ्या वर्षी ‘विनायकी : विनायक गौरव शिष्यवृत्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून, यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या, मात्र थोडक्यात शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसह पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, पीएच.डी. तसेच कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुकला, कृषी, फार्मसी, व्यवस्थापन, विधी आणि पत्रकारिता आदी शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.
स्व. विनायक निम्हण यांनी शिक्षण, आरोग्य, कला आणि सामाजिक विकास या क्षेत्रांना प्राधान्य देत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा जपत सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
गेल्या तीन वर्षांत या शिष्यवृत्ती उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. ऑनलाइन अर्ज १५ जुलैपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.






