Ketan Agrawal Case : सिया-चेतन निर्दोष सुटणार? केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या २६ वर्षीय तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Case) प्रकरणाने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ketan Agrawal Case : पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या २६ वर्षीय तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Case) प्रकरणाने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. १८ जून रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला ट्रेकिंगदरम्यान झालेला एक दुर्दैवी अपघात मानली जात होती.
मात्र, अवघ्या तीन आठवड्यांत पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणाला एका भीषण, नियोजित आणि थंड डोक्याने रचलेल्या मर्डर (Ketan Agrawal Case) प्लॅनचे स्वरूप आल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे.
केतन अग्रवालचा (Ketan Agrawal Case) लवकरच विवाह होणार होता, परंतु लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याचा हा गूढ मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे.
प्रेमसंबंधांत अडसर ठरत असलेल्या केतनचा काटा काढण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून थेट दरीत खाली ढकलून दिल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी केला असून, अपघात दाखवून रचलेला हा मर्डर प्लॅन आता तपासात उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आरोपी सिया गोयलने केतन अग्रवालचा लोहगडावर खून केला, हा केवळ पोलिसांचा संशय कोर्टात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठरत नाही. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जेव्हा कोणताही ठोस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो, तेव्हा कायदा पूर्णपणे ‘परिस्थितीजन्य पुराव्यांवर’ चालतो.
या केसमध्ये गुन्ह्याची साखळी जोडणे हे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे. धक्कादायक म्हणजे, जर या पुराव्यांच्या साखळीत एक जरी दुवा कच्चा राहिला, तर त्याचा थेट फायदा होऊन सिया आणि चेतन या प्रकरणातून सुटू देखील शकतात. त्यामुळे कोर्टात हा गुन्हा नेमका कसा सिद्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषदेत संशय व्यक्त केला की, सिया ठरवलेल्या लग्नामुळे नाखूश होती आणि याच कारणामुळे तिने केतनची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला होता.
एका कॅफेमधील भेटीत या हत्येचा प्लॅन रचण्यात आला होता, इतकेच नव्हे तर त्याचा सरावही करण्यात आला होता. त्यातच केतनच्या हत्येचा एक अयशस्वी प्रयत्नही आधी झाला होता, असे पोलिसांनी मीडियासमोर सांगितले आहे. परंतु, न्यायालयात अद्याप कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली नाही, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे सध्या केवळ आरोपीच आहेत, दोषी ठरलेले नाहीत.
इंडिया टुडेच्या एका अहवालानुसार, कोणत्याही न्यायालयात आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पोलिसांना ठोस पुरावे द्यावे लागणार आहेत. कथित प्रेमप्रकरण हत्येमागील हेतू सिद्ध करू शकते आणि कॅफेमधील भेट व हत्येचा सराव हे एका कटाचा भाग असल्याचे सांगता येऊ शकते. त्याशिवाय फोन रेकॉर्ड्स, कपडे, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन डेटा आणि अपघातानंतरचे वर्तन पुराव्यांची साखळी अधिक मजबूत करू शकतात.
परंतु, या सर्व गोष्टींना न्यायालयात तेव्हाच महत्त्व येईल, जेव्हा ही संपूर्ण साखळी केवळ आणि केवळ ‘केतन घसरला नाही, किंवा त्याने स्वतःहून उडी मारली नाही, तर त्याला मुद्दाम ढकलण्यात आले होते’ याच अंतिम निष्कर्षावर पोहोचेल.
मिळालेल्या माहितीनुसार, केतनला नक्की कोणी ढकलले हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस पुरावा नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. पोलिसांचा संपूर्ण खटला सध्या सिया आणि चेतनच्या कबुलीजबाबांवर अवलंबून आहे, परंतु कायदेशीर चौकटीत याला फारसे महत्त्व नसते.
प्रसिद्ध वकील तनवीर अहमद मीर यांनी स्पष्ट केले आहे की, पोलीस कोठडीत दिलेल्या कबुलीजबाबांना न्यायालयात काहीही किंमत नसते आणि ते निव्वळ ‘निरर्थक’ ठरतात. मीर हे तेच वकील आहेत ज्यांनी २००८ च्या बहुचर्चित आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात तलवार कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करून त्यांना उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली होती.
आरुषी-हेमराज हत्याकांडापेक्षा हा कायदा आणि पुराव्यांचा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करणारे दुसरे कोणतेही प्रकरण नसेल. त्या प्रकरणातही, एका कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर संशय होता आणि जनमानसाने त्यांना आधीच आरोपी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले होते, परंतु उच्च न्यायालयाने याच कायदेशीर तत्त्वांच्या आधारे तो निकाल रद्द केला.
आरुषीच्या प्रकरणात, खुनाच्या रात्री घरात कोणाही बाहेरील व्यक्तीने प्रवेश केला नव्हता, हे निश्चितपणे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अयशस्वी ठरला होता. तर दुसरीकडे बचाव पक्षाने एक प्रबळ पर्यायी शक्यता मांडली की, तिसऱ्याच व्यक्तीने (जसे की कंपाऊंडर कृष्णाने) हा खून केला असू शकतो. बचाव पक्षाला कृष्णानेच खून केलाय हे कोर्टात सिद्ध करण्याची अजिबात गरज नव्हती; त्यांना फक्त न्यायालयाच्या मनात सरकारी पक्षाच्या दाव्याबद्दल एक ‘वाजवी शंका’ निर्माण करायची होती, ज्याचा फायदा आरोपींना मिळाला.
या पार्श्वभूमीवर लोहगड प्रकरणात पुढे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. पुणे पोलिसांना आपले सर्व दावे न्यायालयात कायदेशीर पुराव्यांच्या कसोटीवर सिद्ध करावे लागतील. तपास अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलेला प्रत्येक दावा कायदेशीर पुराव्यात बदलावा लागेल. सियाची नाराजी हेच हत्येचे कारण होते, हे सिद्ध करण्यासोबतच फोन रेकॉर्ड, चॅट्स आणि सीसीटीव्ही फुटेजमधून केवळ संशय नव्हे, तर हत्येचा कट रचला गेल्याचे स्पष्ट झाले पाहिजे.
याशिवाय केतन (Ketan Agrawal Case) पडल्यानंतर आरोपींचे वर्तन कसे होते, त्यांनी कोणाकडे मदत मागितली होती का, त्यांनी केतनच्या कुटुंबाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला का, त्यांनी त्यांचे फोन बंद केले होते का किंवा चॅट्स डिलीट केले होते का, या सर्व गोष्टी पुराव्यांची साखळी जोडण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील.
परंतु, या सगळ्यामुळे केवळ साखळी मजबूत होऊ शकते. कायद्याच्या दृष्टीने हेतू असणे म्हणजे प्रत्यक्ष ढकलणे नव्हे, कट रचणे म्हणजे ढकलणे नव्हे आणि नंतर बोललेले खोटे म्हणजेही ढकलणे नव्हे. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा दुवा ती कडा असेल, जिथून केतन खाली पडला. किल्ल्याचा उतार, ती कडा, तिथला येण्या-जाण्याचा मार्ग आणि केतनचे बूट यावरून हा एक साधा अपघात म्हणजेच घसरून पडणे होते असे दिसते का, याचा सखोल अभ्यास केला जाईल.
तसेच जर त्याला ढकलले गेले असेल, तर ते मुद्दामहून पूर्ण तयारीनिशी ढकलले होते की तिथे झालेल्या एखाद्या वादावादी किंवा झटापटीदरम्यान अचानक घडले, हे स्पष्ट करावे लागेल. पुणे पोलिसांना न्यायालयात खुनाशिवाय इतर सर्व संभाव्य शक्यता पूर्णपणे नाकाराव्या लागतील. जनमानसाने किंवा लोकांनी सियाला भावनांच्या भरात आधीच दोषी ठरवले असले, तरी कोर्टाला मात्र कायद्याच्या चौकटीत बसणारे ठोस पुरावेच आवश्यक असणार आहेत.






