Pimpri : मोशी डेपोत कचरा टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध; आयुक्तांच्या दालनात चर्चा
Pimpri: मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचीही मागणी

पिंपरी – मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर मोशी ग्रामस्थांनी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कचरा डेपोत येऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्याबाबत सोमवारी (दि. २०) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यापुढे कचरा डेपोमध्ये कचरा येऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
या बैठकीला महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसेविका सारिका गायकवाड, सारिका बोऱ्हाडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मंदा आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, उदय गायकवाड, निलेश बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे तसेच मोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमध्ये मोशी ग्रामस्थांनी दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा मांडत, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे, दोषींवर कठोर कारवाई, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री, कचरा डेपोमुळे होणारे आरोग्यविषयक व पर्यावरणीय दुष्परिणाम तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांबाबत आपल्या भावना आणि मागण्या स्पष्टपणे मांडल्या.
ग्रामस्थांनी प्रत्येक मागणीची सखोल मांडणी करत ही घटना केवळ एका दुर्घटनेपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षितता, पर्यावरण आणि प्रशासनावरील विश्वासाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद केले. मोशीकरांच्या न्याय्य मागण्यांवर कोणतीही तडजोड होणार नसून प्रशासनाने याकडे प्राधान्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मोशीच्या ग्रामस्थांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, यंत्रणा व कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत तातडीने वितरित करण्यात यावी. जखमी नागरिकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिका व शासनामार्फत उचलण्यात यावा.
पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय किंवा महापालिका सेवेत नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. मोशी कचरा डेपो बाबत निर्णय घेऊन परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्यात यावा. परिसरातील आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात. ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व प्रलंबित नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावेत अशा मागण्या मोशीच्या ग्रामस्थांनी केल्या.
बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश देण्याबरोबरच मोशी ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न टप्प्याटप्प्याने आणि प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात प्रशासन कोणतीही दिरंगाई करणार नसून आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही नियमांनुसार गतीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मोशीतील प्रत्येक नागरिकाची वेदना मी जवळून अनुभवली आहे. दुर्घटनेत जीव गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि मोशीकरांचे प्रत्येक न्याय्य प्रश्न मार्गी लावणे, ही माझी नैतिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी आहे. मोशीकरांना दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील. नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षितता यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.’ – रवि लांडगे, महापौर





