अग्रलेख : ‘ला रोजा’चे वर्चस्व
फिफा फुटबॉल विश्वचषक (FIFA Football World Cup) स्पर्धेचे विजेतेपद ला रोजा म्हणजे स्पेन संघाने पटकावले. खरेतर या स्पर्धेचा अंतिम सामना एकतर्फी ठरला व त्यात स्पेनने बलाढ्य अर्जेन्टिनाचा अतिरिक्त वेळेत 1-0 असा पराभव करत या विश्वचषकावर नाव कोरले.

FIFA Football World Cup : फिफा फुटबॉल विश्वचषक (FIFA Football World Cup) स्पर्धेचे विजेतेपद ला रोजा म्हणजे स्पेन संघाने पटकावले. खरेतर या स्पर्धेचा अंतिम सामना एकतर्फी ठरला व त्यात स्पेनने बलाढ्य अर्जेन्टिनाचा अतिरिक्त वेळेत 1-0 असा पराभव करत या विश्वचषकावर नाव कोरले. पण असे वर्णन करणे स्पेनवर अन्याय ठरेल, कारण त्यांनी या सामन्यात बलाढ्य अर्जेन्टिनाला एकही संधी दिली नाही.
लिओनेल मेस्सीसारखा जागतिक कीर्तीचा खेळाडूही या संपूर्ण सामन्यात हतबल ठरला. त्यांच्या संघाचे एक, दोन नव्हे तर तब्बल 11 शॉट अपयशी ठरले. सामन्याच्या पूर्ण वेळेत म्हणजे 90 मिनिटांमध्ये स्पेनच्या भक्कम बचावासमोर अर्जेन्टिनाच्या एकाही खेळाडूला यश मिळाले नाही. अर्जेन्टिनाचा संघ पेनल्टी शुटआउटकडे डोळे लावून बसला होता. त्यांना खात्री होती की ते त्यात यशस्वी होतील, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. हा सामना अतिरिक्त वेळेत गेल्यावर चित्रच पालटले.
त्यात फेरान टोरेसने अफलातून गोल केला व अर्जेन्टिनाच्या सलग दुसर्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या आशा धुळीला मिळवल्या. स्पेनने 2008 मध्ये युरो करंडक जिंकला होता तर 2010 मध्ये फिफा विश्वचषक (FIFA Football World Cup) जिंकला होता. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी त्यांनी पुन्हा या चषकावर ताबा मिळवला. अतिरिक्त वेळेतील 106व्या मिनिटाला निको विल्यम्सने दिलेल्या अचूक पासवर टोरेसने गोल केला व त्यानंतर अर्जेन्टिनाला संधीच राहिली नाही. मेस्सीच्या डोळ्यांतील अश्रूच सर्वकाही सांगून जात होते. तो चक्क मान खाली घालून मैदानात बसला, त्याचे सहकारी त्याचे सांत्वन करत होते.
मात्र, तो जणू सर्वकाही संपले अशाच अवस्थेत बसला होता. त्याला सावरायला खूप वेळ लागला. त्याने स्पेन संघातील खेळाडूंचे अभिनंदनही केले, मात्र त्याचवेळी त्याच्या निवृत्तीची चाहूलही लागली. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने 2021 आणि 2024 ची कोपा अमेरिका तसेच 2022 चा फिफा विश्वचषक जिंकला होता. या पराभवामुळे त्याच्या त्या शानदार प्रवासाची अखेर झाली. मेस्सीने या स्पर्धेत आठ गोल आणि चार असिस्टची नोंद केली, परंतु फुटबॉलमधील सर्वात मोठा किताब जिंकण्यात स्पेनने आपली पकड मजबूत राखल्यामुळे मेस्सीला आपल्या संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणता आले नाही.
या स्पर्धेत सुरुवातीला अर्जेन्टिना, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स व जर्मनी यांच्यापैकीच एक संघ विजेता बनेल अशी अटकळ लावली जात होती. मात्र, स्पेनने सुरुवातीपासून जो खेळ केला, त्यानंतर समीक्षकांनीही त्याची दखल घेतली. लुईसडे ला फुएंतेयां यांच्या प्रशिक्षणात तयार झालेला स्पेनचा संघ आज जगातील सर्वोत्तम बचाव करणारा संघ म्हणून ओळखला जातो. सलग स्पर्धांमध्ये युरोपियन चॅम्पियनशिप आणि फिफा विश्वचषक जिंकणारा स्पेन हा एकमेव देश बनला आहे. त्यांनी ही कामगिरी आता दोनदा करून दाखवली आहे.
त्यांनी या स्पर्धेतही (FIFA Football World Cup) बचाव इतका भक्कम केला होता की, अंतिम लढतीत अर्जेन्टिनाला केवळ दोन संधी मिळाल्या आणि त्या देखील वाया गेल्या. याचे मुख्य कारण त्यांचा गोलकीपर उनाइ सिमॉन. त्याच्या बचावासमोर अर्जेन्टिनाचा एकही प्रयत्न सफल होऊ शकला नाही. आज जगातील सर्वोत्तम गोलकीपरच्या पंक्तित सिमॉनचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्पेनने या स्पर्धेच्या सुरुवातीला केप वर्डेविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सोडवला. पण त्यानंतर संघाने मागे वळून पाहिले नाही.
ग्रुप स्टेजमध्ये सौदी अरेबियाला 4-0 आणि उरुग्वेला 1-0 ने हरवून बाद फेरीमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर स्पेनने ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, बेल्जियम आणि फ्रान्ससारख्या मजबूत संघांना सलग हरवले. इथेच त्यांच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. या अंतिम सामन्याचा एक महत्त्वाचा क्षण होता ज्यावेळी 93 व्या मिनिटाला एन्झो फर्नांडेझला दुसरे पिवळे कार्ड मिळाले, त्यामुळे ते रेड कार्डमध्ये बदलले गेले व त्याला मैदान सोडावे लागले. याचमुळे त्यांना उर्वरित सामना 10 खेळाडूंनीशीच खेळावा लागला.
हा सामनाही स्पेनच्या 2010 मधील विश्वविजेतेपदासारखाच ठरला. त्या सामन्यातही अतिरिक्त वेळेत 116 व्या मिनिटाला आंद्रेस इनिएस्ताने गोल केला होता. या पराभवामुळे अर्जेन्टिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यापूर्वीही त्यांना 1930, 1990, 2014 मध्ये उपविजेतेपदावर संतुष्ट व्हावे लागले होते. मात्र, 2022 मध्ये त्यांनी हा दुष्काळ दूर करत विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्यांचेच पारडे जड राहणार असे वाटत होते मात्र, स्पेनने त्यांच्यावर दडपण टाकले व सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून भक्कम बचाव करत अर्जेन्टिनाचे गोल करण्याचे सगळे मनसुबे उधळून लावले.
या स्पर्धेत स्पेनचा संपूर्ण संघ एकजुटीने खेळला. संघाकडे लामिन यामालसारखा स्टार खेळाडू होता. तर कर्णधार रोड्रीने मिडफिल्डमधून खेळावर नियंत्रण ठेवले. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकीपर असलेल्या उनाइ सिमॉनविरुद्ध संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल झाला. सिमॉनला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकीपर म्हणून निवडण्यात आले.
त्याला गोल्डन ग्लव्ह अवॉर्ड देण्यात आला. सिमोनने मैदानात तब्बल 857 मिनिटे घालवली. त्याने 14 गोल अडवले. त्याने पेनल्टी एरियाच्या आत 120 आणि बाहेर 93 इंटरसेप्ट केले. संपूर्ण स्पर्धेत त्याने फक्त एक गोल खाल्ला, तोही उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध. त्यानंतर त्याने स्पेनची भिंत अभेद्द राखली. पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी लामिन यमाल हा नवा स्टार फुटबॉल जगताला मिळाला आहे.
मेस्सीच्या मांडीवर बसून एकेकाळी प्रसिद्ध झालेला हा 19 वर्षांचा युवा खेळाडू मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पेच्याच तोडीचा आहे. त्याने या संपूर्ण स्पर्धेत फार काळ मैदानावर घलवला नसला तरीही जेव्हा तो मैदानात उतरला, तेव्हा त्याने आपल्या ड्रबलींगने समोरच्या संघाला नामोहरम केले आहे.
येत्या काळात जागतिक फुटबॉल (FIFA Football World Cup) गाजवण्यासाठी यमालसह अन्य दुसरे नाव सध्यातरी दिसत नाही. रोनाल्डोने निवृत्ती घेतली असून मेस्सीही त्याच उंबरठ्यावर उभा आहे त्यामुळे 2030 मध्ये होत असलेल्या स्पर्धेत यमाल हाच ब्रँड असेल व पारडेही स्पेनचेच जड राहील अशी अपेक्षा आहे.






