Pune Gramin : भोर तालुक्यातील निगडे खुर्द गावात स्मशानभूमी अभावी ग्रामस्थ त्रस्त

भोर : पुणे जिल्ह्यातील राजगड (भोर) तालुक्यातील दुर्गम निगडे खुर्द या गावात मृत्यूनंतरही ग्रामस्थांना वेदना सहन कराव्या लागत असल्याचे मन सुन्न करणारे वास्तव समोर आले आहे. गावात अद्याप स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच मृत व्यक्तींवर अंत्यविधी करावा लागत आहे.
अलीकडेच सावित्रीबाई श्रीपती शिंदे यांचे निधन झाले. मात्र, स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना भर पावसात वेळवंडी नदीच्या किनारी उघड्यावरच अंत्यविधी करावा लागला. अंत्यविधी सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. सरण भिजू नये म्हणून नातेवाईकांनी ताडपत्री धरून अंत्यसंस्कार केले. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी वारंवार मागण्या करण्यात आल्या. मात्र, अद्याप निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मृत व्यक्तीवर अशाच प्रकारे उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ येत असून ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामस्थांनी तातडीने स्मशानभूमीसाठी निधी मंजूर करून गावाला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.





