Nagar | ग्रामस्थ त्रस्त, कर्मचारी मस्त : घोडेगाव महावितरणचा भोंगळ कारभार

घोडेगाव, (वार्ताहर): महावितरण कंपनीचे घोडेगाव सबस्टेशनचा भोंगळ कारभाराने ग्रामस्थ व वीज कंपनीचे ग्राहक यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचारी उपलब्ध नसणे, अवेळी जाणारी वीज व फोन न घेणारे कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या अर्वाच्य बोलण्यामुळे ग्रामस्थांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून, हा त्रास न थांबल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
घोडेगाव महावितरण कार्यालयात अनेक दिवसांपासून अभियंता उपलब्ध नव्हते, नवीन अभियंता हजर झाले असले तरी कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेऊन कारभारात सुधारणा करणे आवश्यक आहे. रात्री-अपरात्री वीज गेल्यावर महावितरणचा जुना क्रमांकावर फोन लागत नाही. नवीन क्रमांक अनेकदा रिंग जाऊन देखील घेतला जात नाही.
वीज येईल की नाही याची माहिती देखील ग्रामस्थांना दिली जात नाही. थोडासा पाऊस झाला तरी वीज जाणे नित्याचे झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून, बोलावे तरी कुणाला ,असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
रात्रीच्या वेळी सबस्टेशन येथे कर्मचारी नसणे, फोन न घेणे, अरेरावीची भाषा वापरणे, वीजबिल रिकव्हारी वेळी अर्वाच्य भाषेचा वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
नोकरीच्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी वास्तव्यास नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सत्तर टक्के कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास नसल्यामुळे अनेकदा ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब ग्रामस्थांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तरी देखील अधिकारी काही ठराविक कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा गावात होत आहे.
ऊन, वारा,पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये जीवाची बाजी लावून काम करणारे अनेक प्रामाणिक कर्मचारी देखील आहेत, परंतु काही कर्मचारी अपवाद असल्यामुळे गव्हासोबत किडे रगडतात, या म्हणीचा प्रत्यय सध्या घोडेगाव महावितरण मध्ये दिसत आहे.
महावितरण कार्यालय घोडेगाव येथील कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. आम्ही ग्रामपंचायतकडून अनेकदा याबाबत सांगून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, ग्राहकांना अडवणूक करणे, कार्यालयीन ठिकाणी वास्तव्यास नसल्यामुळे मोठा मन:स्ताप नागरिकांना होत आहे.
याबाबत अनेकदा कळवून देखील अधिकारी काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. यापुढे या ठराविक कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबली नाही तर ग्रामस्थांसह आम्ही उपोषण करणार आहोत. वसंतराव सोनवणे, सदस्य ग्रामपंचायत, घोडेगाव.





