Pune District : घोडेगाव पंचायत समितीच्या जागेवर उभारणार व्यापारी संकुल

– माजी ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
मंचर – घोडेगाव शहर आणि परिसरातील व्यापार वाढ होण्यासाठी, पंचायत समितीच्या जागेत व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे पंचायत समिती सभागृहात घोडेगावमधील प्रलंबित प्रश्न व नवीन सुचवलेल्या कामांसदर्भात वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती कैलासबुवा काळे,
सखाराम घोडेकर, सुभाष मोरमारे, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, सरपंच अश्विनी तिटकरे, उपसरपंच स्वप्निल घोडेकर, सोमनाथ काळे, तुकाराम काळे, सुनील इंदोरे, तहसीलदार संजय नागटिळक, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार, तसेच इत्यादी उपस्थित होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, घोडेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे, येथे सतत वर्दळ असते, तसेच भीमाशंकरकडे जाणारे पर्यटक व भाविक घोडेगावमधून जातात. यासाठी रस्त्याला लागून असलेल्या पंचायत समितीच्या जागेत व्यापारी संकुल उभे करून घोडेगाव शहरातील व्यापाऱ्यांना व व्यापारवाढीला एक चांगली संधी मिळणार आहे.
पंचायत समितीच्या जागेत सुरू असलेले ग्रामीण रूग्णालय नवीन जागेत स्थलांतरित झाल्याबरोबर येथे व्यापारी संकूल उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे त्यांनी सांगितले.तसेच घोडेगाव मधिल कचरा प्रश्न गंभीर असून यावर मार्ग काढावा. अशी सूचना वळसे पाटील यांनी केली. यासाठी खाजगी कंपनी नेमून त्या मार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावू. असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले. घोडेगाव नगर पंचायत व्हावी. अशी मागणी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे, ग्रामस्थांची ईच्छा असेल तर घोडेगाव नगरपंचायत करावी.
रस्ता रुंदीकरण लवकर करावे
घोडेगावमधील महसूल भवनच्या जागेत अभ्यासिका सुरू करावी, जुन्नर फाटा ते चिंचोली व मंचर ते घोडेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे, घोडेगाव शहराच्या बाजूने असलेल्या दोन्ही ओढ्यांना आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंती व ओढा स्वच्छतेचे काम केले जावे, अशी सूचना वळसे पाटील यांनी दिल्या.





