Ambegaon News : हृदयद्रावक घटना! रस्ता नसल्याने २ वर्षांच्या चिमुरड्याचा वाटेतच अंत; आंबेगावात संतापाची लाट
Ambegaon News : आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार येथील दोन वर्षीय बालकाचा उपचाराअभावी मृत्यू; जंगलातील कठीण पायवाटेने प्रवास करताना झाला विलंब.

Ambegaon News – आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार येथे दळणवळणाच्या अभावामुळे दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. खेतेपठार येथील आदित्य विकास घनकुटे या दोन वर्षीय बालकाला आई वरणभात खाऊ घालत असताना, ठसका लागला आणि तो घाबरा झाला.
त्याला उपचारासाठी त्याची आई आणि आजी घोडेगाव येथे घेऊन निघाल्या होत्या. मात्र गावातून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने त्यांना जंगलातील दगड-गोट्यांच्या कठीण पायवाटेने पायी प्रवास करावा लागला. या प्रवासात झालेल्या विलंबामुळे बालकाला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला आहे. देशाला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली असतानाही, अनेक आदिवासी व डोंगरी भागांमध्ये मूलभूत सुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्ते, निवारा आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
मात्र खेतेपठारसारखी गावे या योजनांपासून वंचित राहिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक अजूनही दळणवळणाच्या सोयीपासून दूर असून त्यांच्या जीवनमानावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. आता तरी प्रशासनाने रस्त्याची कामे करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“ही अत्यंत दुर्दैवी घटना असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका निष्पापाला जीव गमवावा लागला. तातडीने रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई झाली पाहिजे.”
– रमेशभाऊ येवले, शिवसेना नेते, आंबेगाव तालुका





