पुणे जिल्हा | खेडचे तहसीलदार, बीएलओ दबावाखाली

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – मतदार यादीबाबत खेडचे तहसीलदार आणि बीएलओ दबावाखाली येऊन काम करीत आहेत. मयत, परागंदा असलेल्या व्यक्तींचे पंचनामे पारदर्शक करा. मतदारांचे अधिकारी मतदारांना द्या, तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका,
तहसीलदार आणि बीएलओ यांनी पारदर्शक कारभार करावा, अन्यथा मतदारांचा मोठा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढला जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार अतुल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख यांनी मंगळवारी (दि. 13) पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले की, 2014 ला तालुक्यात ट्रॅक्टर मोर्चा काढला, गावागावात जाऊन दिलीप मोहितेंच्या विरोधात काम केले.
या सगळ्या गोष्टी अंगावर घेऊन आम्ही केल्या. कारण आमदार दिलीप मोहिते पाटील यांची तालुक्यात दहशत आहे, त्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून मी पुढाकार घेतला आहे.
तालुक्याचा विकास दूरदृष्टी ठेवून विकास झाला पाहिजे. आमदार मोहिते यांना कोण पाडू शकेल याचा जनता विचार करेल. महाविकास आघाडीचा उमेदवार जो कोण असेल त्यांच्यमागे एकत्र येऊन आम्ही जाणार आहोत.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांना अनेक निवडणुकीचा अनुभव असला तरी त्यांच्या विरोधात 1 लाख 20 हजार मतदार आजही आहेत. तालुक्यात शरद पवारांकडे मतदारानाचा कौल आहे. जे लोकसभेला झाले तेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
त्या वक्तव्याची मागितली माफी
पवार गटाचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात अतुल देशमुख यांनी स्व. आमदार सुरेश गोरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते.
त्या भाषणातील काही शब्दांचा विपर्यास करून दिलीप मोहितेपाटलांच्या समर्थकांकडून अतुल देशमुख यांना ट्रोल केले जात होते त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागून यावर पडदा टाकला.
श्रेयवादापेक्षा जनतेला पाणी द्या
राजगुरूनगर शहराला पाणीपुरवठा करणार्या चासकमान धरणातील पाणी योजनेचे काम पूर्ण आहे. माझ्या कोंबड्याने पहाट होणार हे ठीक नाही.
प्रांत प्रशासक म्हणून गेली अडीच वर्षे काम करीत आहेत. त्यांच्याकडून पाणी योजनेचे काम करून घेणे आमदारांची जबाबदारी आहे; मात्र तसे होत नाही त्यात ते कमी पडतात कारण आमदारांची इच्छा नाही.
अतुल देशमुख यांनी राजगुरूनगर पाणी प्रश्नावर कधीही श्रेयवाद केला नाही. उद्घाटन तुम्ही करा, क्रेडिट तुम्ही घ्या पण जनतेला पाणी द्या असे आवाहन दिलीप मोहिते पाटील यांना करीत आमदारांनी जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन केले. राजगुरूनगर शहराला शुद्ध स्वच्छ पाणी देण्यासाठी पुढाकार घ्या, असा सल्ला अतुल देशमुख यांनी दिला आहे.





