Mahatma Phule Jayanti – क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त राजगुरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या काव्यजागराने सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची खेड शाखा आणि महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सावित्रीबाई फुले सभागृहात या विशेष कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फुले विचारांचा जागर घडवून आणत सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाची हाक देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी डॉ. संजय बोरुडे उपस्थित होते. संमेलनाध्यक्षपद कवी श्रीकांत ढेरंगे यांनी भूषविले, तर शांताराम (बापू) घुमटकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांभाळले. यावेळी आदर्श शिक्षक जी. रं. शिंदे, पंचायत समिती सदस्य शंकरराव कावडे आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी संतोष गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने आणि फुले दांपत्याच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. संजय बोरुडे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांचे विचार ही वर्तमान आणि भविष्याची दिशा असल्याचे सांगितले. कविसंमेलनात मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवडसह विविध भागांतून आलेल्या सुमारे ४० कवींनी सहभाग नोंदवला. त्यांच्या कवितांमधून शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समता आणि सामाजिक न्याय या विषयांवर प्रभावी मांडणी करण्यात आली. सहभागी कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले, तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शैलेश गायकवाड, विलास बाबर, अलका भवारी, कमल कळमकर आणि डी. के. वडगांवकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ऊफाडे व रुपाली मेदगे यांनी केले, तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.