Pune name change : पुण्याची ओळख बदलण्याची मागणी.! शहराचं नाव ‘फुलेनगर’ करा; नामांतरासाठी ओबीसी मोर्चा मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
२०२७ मध्ये त्यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे नाव ‘फुलेनगर’ करण्याची मागणी अत्यंत योग्य असल्याचे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Pune name change : पुणे शहराची ओळख आता बदलणार का? विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचे नाव ‘फुलेनगर’ करावे, अशी मागणी पुढे आली आहे. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी लावून धरली आहे.
महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माच्या द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधत पुण्याचे नामांतर करण्याबरोबरच त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
पुण्याचं नाव ‘फुलेनगर’ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे शहराचे नाव बदलून ‘फुलेनगर’ करावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. महात्मा जोतिराव फुले यांची पुणे ही कर्मभूमी होती.
त्यांनी याच भूमीतून सामाजिक समता, शिक्षण आणि स्त्रीशिक्षणाचा विचार समाजापर्यंत पोहोचवला. त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव व्हावा आणि पुढील पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नामांतराची मागणी करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘२०२७ हे द्विशताब्दी वर्ष; नामांतराची मागणी योग्य’
महात्मा जोतिराव फुले यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. २०२७ मध्ये त्यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे नाव ‘फुलेनगर’ करण्याची मागणी अत्यंत योग्य असल्याचे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महात्मा फुले यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा सन्मान व्हावा, हाच या मागणीमागील प्रमुख उद्देश आहे. पुणे शहराच्या इतिहासात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महात्मा फुले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शहराची ओळख निर्माण व्हावी, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ द्या !
केवळ पुण्याच्या नामांतरावरच मोर्चा थांबलेला नाही. महात्मा जोतिराव फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहराला शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देण्यात महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.







