Saif Ali Khan : ५६ व्या वर्षी सैफ अली खानचा फिटनेस पाहून चाहते थक्क; सूर्यनमस्काराचा व्हिडीओ व्हायरल !
सैफने ऑक्टोबर २०२६ मध्ये अधिकृतपणे इन्स्टाग्रामवर प्रवेश केला. याआधी तो सोशल मीडियापासून काहीसा दूरच होता.

Saif Ali Khan : बॉलिवूडमध्ये फिटनेसचा विषय निघाला की अनेक कलाकारांची नावे समोर येतात. मात्र, वय वाढत असतानाही शरीराची लवचिकता, ताकद आणि फिटनेस टिकवून ठेवणे ही काही सोपी गोष्ट नाही. अभिनेता सैफ अली खानने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओतून याचीच झलक दाखवली आहे.
सूर्यनमस्कार करतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत असून, त्याची चपळता आणि फिटनेस पाहून चाहतेही प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे, पत्नी करीना कपूर खानने केलेल्या मजेशीर कमेंटने या व्हिडीओची रंगत आणखी वाढवली आहे.
सैफ अली खानने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो कोणत्याही गडबडीशिवाय, अतिशय सहजपणे योगासनांच्या विविध स्थिती करताना दिसत आहे. त्याच्या हालचालींमधील नियंत्रण, शरीराची लवचिकता आणि फिटनेस विशेष लक्षवेधी ठरत आहे.
व्हिडीओ शेअर करताना सैफने लिहिले, “कामाला पुन्हा सुरुवात करण्याची वेळ आली आहे. नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी आधी मनाला आणि त्यानंतर शरीराला पुन्हा योग्य मार्गावर आणायचे आहे.” सैफच्या या पोस्टमधून त्याने मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिल्याचे दिसते.
करीनाची कमेंट ठरली चर्चेचा विषय!
सैफच्या या फिटनेस व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेतली ती पत्नी करीना कपूर खानच्या कमेंटने. करीनाने मजेशीर अंदाजात, “सूर्यनमस्काराच्या बाबतीत तू मला मागे टाकलंस,” अशी प्रतिक्रिया दिली. सैफची बहीण सोहा अली खान हिनेही त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत कौतुक केले.
दरम्यान, सैफने ऑक्टोबर २०२६ मध्ये अधिकृतपणे इन्स्टाग्रामवर प्रवेश केला. याआधी तो सोशल मीडियापासून काहीसा दूरच होता. त्याने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट पाटौदी पॅलेसमधील लायब्ररीतील छायाचित्रांची शेअर केली होती. त्यानंतर आता त्याच्या फिटनेस व्हिडीओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






