Vikram-1 Launched : अंतराळात भारताची ऐतिहासिक झेप! ‘विक्रम-1’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
भारताने अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा नवा इतिहास रचला आहे. हैदराबाद येथील 'स्काईरूट एयरोस्पेस' या खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीचे 'विक्रम-१' हे रॉकेट (Vikram-1 Launched) आपल्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी यशस्वीरित्या झेपावले आहे.

Vikram-1 Launched : भारताने अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा नवा इतिहास रचला आहे. हैदराबाद येथील ‘स्काईरूट एयरोस्पेस’ या खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीचे ‘विक्रम-१’ हे रॉकेट (Vikram-1 Launched) आपल्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी यशस्वीरित्या झेपावले आहे.
तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला प्रक्षेपणास काहीसा उशीर झाला, परंतु सर्व आव्हानांवर मात करत रॉकेटने अवकाशात यशस्वी भरारी घेतली. हे मिशन केवळ स्काईरूट कंपनीसाठीच नाही, तर संपूर्ण भारताच्या अंतराळ इतिहासातील एक मैलाचा दगड ठरले आहे.
भारत तिसरा देश
या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत आता जगातील अशा निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, जिथे खाजगी कंपन्यांनी स्वतःच्या बळावर रॉकेट लाँच केले आहे. खाजगी क्षेत्रातील या यशासह अमेरिका आणि चीननंतर अशी गौरवशाली कामगिरी करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.
डॉ. विक्रम साराभाई यांना अनोखी मानवंदना
भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या पहिल्या खाजगी रॉकेटचे नाव ‘विक्रम-१’ असे ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘इस्रो’च्या लाँच सेंटरवरून याचे प्रक्षेपण करण्यात आले.
‘विक्रम-1’ ची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्ट
उंची: सुमारे ७ मजली इमारतीएवढी.
कक्षा: पृथ्वीपासून साधारण ४५० किलोमीटर उंचीवर असलेली लो अर्थ ऑर्बिट
उद्दिष्ट: उपग्रहांना त्यांच्या ठरवून दिलेल्या कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित करणे.
अंतराळ क्षेत्रातील ‘कॅब सर्व्हिस’!
स्काईरूट एयरोस्पेसच्या अधिकृत निवेदनानुसार, अंतराळ सेवा सर्वसामान्यांसाठी सोप्या आणि सुलभ बनवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. भविष्यात कंपनी स्वतःला अंतराळ क्षेत्रातील ‘कॅब सर्व्हिस’ म्हणून विकसित करत आहे. म्हणजेच, येत्या काळात वेगवेगळ्या व्यावसायिक कंपन्या आपल्या गरजेनुसार स्काईरूटच्या रॉकेट सेवेचा वापर करून आपले सॅटेलाइट अंतराळात पाठवू शकतील. यामुळे व्यावसायिक संधींना मोठी गती मिळणार आहे.
‘ऑपरेशन प्रारंभ’ ते ‘विक्रम-1’ चा यशस्वी प्रवास
यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये स्काईरूट कंपनीने ‘विक्रम-एस’ या सबऑर्बिटल मोहिमेचे यशस्वी आयोजन केले होते, ज्याला ‘ऑपरेशन प्रारंभ’ असे नाव देण्यात आले होते. त्या पहिल्या यशानंतर आता ‘विक्रम-१’ च्या या ऐतिहासिक उड्डाणाने भारताने खाजगी अंतराळ क्षेत्राची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे.





