विखे पाटील यांनी महामारीत राजकारण करु नये – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नगर (प्रतिनिधी) – जागतिक महामारीच्या संकटात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण करु नये. करोना महामारीत उपायोजना करण्यासाठी दोन आठवड्यांत मी नगरला येतो. शिवाय चार दिवसांपूर्वी शिर्डीत घेतलेल्या आढावा बैठकीत आपणच उपस्थित होता. त्यामुळे असे राजकारण करु नका, असा सल्ला राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे.
विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री नगरचे पाहुणे असून, जिल्ह्यातील तिन्ही मंत्री कर्तव्यशून्य असल्याची टीका केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी विखे पाटील यांच्या टीकेला उत्तर देणारी भूमिका मांडली आहे. संपूर्ण जगामध्ये करोना महामारीचा प्रकोप झालेला आहे. त्याचा परिणाम आपल्या देशात, राज्यात व जिल्ह्यातही दिसून येतो. संपूर्ण मानवजातीवरचे हे संकट आहे. त्यामुळे यात विखे पाटील यांनी कोणतेही राजकारण करु नये. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन करोनाच्या संकटाचा मुकाबला करावा लागणार आहे, अशी भूमिका पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांकडे दिलेल्या प्रेसनोटमध्ये मांडली आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सातत्याने माझा वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क सुरु आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी देखील मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नामदार राजेंद्र शिंगणे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात होतो. टँकर नगरला पोचल्यावरच मी जेवण घेतले. गरज असल्यास आमच्या मोबाईलचे सीडीआर आम्ही आपणांस देऊ, असेही आव्हानही पालककमंत्री मुश्रीफ यांनी दिले आहे.
विखे पाटील यांचे आभारही…!
माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपले वैद्यकीय महाविद्यालय कोविड केअरसाठी उपलब्ध करुन दिलेत. त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी या प्रेसनोटमध्ये स्पष्ट केले आहे. परंतु, ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशामुळे आपणांस नगरच्या जिल्हा बँकेची निवडणूक घ्यावी लागली, तसेच आदेश न्यायालयाने कोल्हापूरमधील ‘गोकूळ’च्या निवडणुकीसाठी देखील दिले होते. त्यामुळे ती निवडणूक घ्यावी लागली, असेही उत्तर विखेंच्या एका आरोपाला मुश्रीफ यांनी दिले आहे.





