हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी; न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार

मुंबई : दोन वर्षांपूर्वी संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची आज महत्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, या प्रकरणातील आरोप सिद्ध झाले असून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. न्यायालय उद्या आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
आज सकाळी ११.३० वाजता आरोपीला चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड.उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आजच्या सुनावणीत आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आले आहे. आता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी १० फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.
३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले होते. १० फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून होत होती. पोलिसांकडून याप्रकरणी ४२६ पानांचे दोषारोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होत असून तिच्या स्मृतीदिनीच न्यायालय शिक्षेची सुनावणी करणार आहे.





