मुंबई : राज्यात विविध समाजांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे.ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंबंधी राज्य शासनाने जीआर काढला आहे. याच आदेशाला राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध नेत्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी नोंदी दिल्याने ओबीसी आरक्षण संपेल असा आरोप या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत हैदराबाद गॅझेटसंबंधी जीआरवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून त्या गॅझेटमध्ये बदल करावा अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे. हैदराबाद गॅझेटच्या आदेशाला विरोध करण्यासाठी राज्यातील ओबीसी नेत्यांनी १० ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्या आधी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. कोणत्याही परिस्थितीत १० ऑक्टोबर रोजी ओबीसी समाजाचा मोर्चा काढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.