Vijay Wadettiwar : ‘कृषीमंत्री सिनेतारका नाचवण्यात व्यस्त’ – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पण महायुती सरकार विशेषतः राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची तरी कुणाकडे? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३,४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात अद्याप केंद्रीय कृषीमंत्री आले नाहीत. त्यासाठी महायुती सकारने पाठपुरावा केला नाही.
केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत का? केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राला ही सापत्न वागणूक का? केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? अशा प्रश्नांचा भडीमार करत वडेट्टीवार यांनी केंद्र-राज्य सरकारला फटकारले आहे. यावेळी त्यांनी विघ्नहर्ता महायुतीचे महाराष्ट्रावरील विघ्न दूर करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
वडेट्टीवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादात हे सरकार अडकले आहे. या सरकारमधील मंत्री स्वत:च्या मुलीला, जावयाला नदीत ढकला असं म्हणत असेल तर या सरकारकडून जनतेने कोणती अपेक्षा करायची. फसव्या योजनांना महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे.
बाँम्बेचं मुंबई असे नामकरण करण्यात भाजपचे योगदान आहे असे भाजपचे नेते म्हणत आहेत. कारण लोकसभेला जनतेने नाकारल्यामुळे विधानसभेला मते मिळविण्यासाठी अशी वक्तव्ये पुढे येत आहेत. महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावचा रंग उडाला असून शेतकरी यांना धडा शिकविणार आहे, असेही ते म्हणाले.





