ओझर: जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम २०२५-२६ साठी मील रोलर पूजन शनिवारी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाइस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले की, आगामी गाळप हंगामासाठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून ऑक्टोबर २०२५ मध्ये कारखाना गाळपासाठी पूर्णपणे सज्ज होईल. तसेच, सहवीज निर्मिती आणि डिस्टीलरी प्रकल्पांची कामेही प्रगतीपथावर आहेत. यंदा शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे मोठा कल दिसत असून, कारखान्यामार्फत आडसाली ऊसासाठी बियाणे पुरवठा प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५,००० मे. टनावरून ७,५०० मे. टनांवर वाढवण्यात आली असून, हंगाम २०२५-२६ मध्ये प्रतिदिन ८,५०० ते ९,००० मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरून ऊस तोडणीचे नियोजन प्रभावीपणे करता येईल, असे आवाहन शेरकर यांनी केले. याशिवाय, कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणे आणि विघ्नहर कृषी अमृत सेंद्रिय खताचे वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गाळप हंगाम २०२५-२६ साठी कारखान्याचे १३ लाख मे. टनांहून अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ऊस तोडणी आणि वाहतूक लेबरचे नियोजन करारानुसार सुरू असून, ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याचे शेरकर यांनी स्पष्ट केले. या पूजन सोहळ्याने कारखान्याच्या आगामी हंगामाच्या तयारीला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे.