Ozar News : विघ्नहर’ चे 40 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न

जुन्नर: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाला सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे साध्या पद्धतीने सुरुवात झाली. कारखान्याचे संचालक सुरेशशेठ भिमाजी गडगे आणि त्यांच्या पत्नी अमृताताई गडगे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपनाचा समारंभ पार पडला. यंदाच्या हंगामासाठी सर्व मशिनरीची देखभाल आणि दुरुस्ती पूर्ण झाली असून, कारखाना ऊस गाळपासाठी पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी दिली.
हंगाम नियोजन आणि गाळप क्षमता
राज्य मंत्री समितीच्या बैठकीत 2025-26 च्या गळीत हंगामाची तारीख जाहीर झाल्यानंतर विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. यंदा 13 लाख मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. मागील हंगामात शासकीय धोरणांमुळे कारखाना उशिरा सुरू झाला होता, तसेच आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाची कामे सुरू होती. आता ही कामे पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5,000 मेट्रिक टनांवरून 7,500 मेट्रिक टनांवर गेली आहे. यामुळे यंदा प्रतिदिन 8,000 ते 8,500 मेट्रिक टन ऊस गाळप होणार आहे. तसेच, 65 केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प आणि को-जन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत.
शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन, खते आणि इतर सुविधांचा लाभ घेऊन उत्पादन वाढवावे असे आवाहन शेरकर यांनी केले. “शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी देऊन कारखान्याला सहकार्य करावे,” अशी विनंती त्यांनी केली.
उपस्थित मान्यवर
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाला चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाइस चेअरमन अशोक घोलप, सुमित्रा शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक, अधिकारी, कामगार युनियन, सेवक पतसंस्था आणि सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.





