पुणे जिल्हा | साखर उतारा विभागात विघ्नहर द्वितीय

ओझर, (वार्ताहर)- नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा हंगाम 2022-23 चा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसर्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास मिळाला.
नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. 10) केंद्रीय सहकारमंत्री तथा गृहमंत्री अमित शहा, सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, उत्तर प्रदेशचे गन्नामंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, नॅशनल फेडेरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाइस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्व संचालक मंडळ सदस्य आणि अधिकारी वर्गाने हा पुरस्कार स्विकारला असल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी दिली. याप्रसंगी साखर उद्योगातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सत्यशील शेरकर म्हणाले की, कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली. श्री विघ्नहर कारखान्यास यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांचा शेतकरी हित जोपासने व पारदर्शक कारभार याच धर्तीवर विघ्नहर कारखान्याची वाटचाल सुरू आहे.
मिळालेल्या या पुरस्काराने विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विघ्नहर कारखाना गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर करुन जास्तीत जास्त ऊस गाळप करताना संपूर्ण उसाची नोंदणी संगणकीकृत केल्याने ऊस तोडणीचे नियोजन काटेकोरपणेझाणले. त्यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत झाली.
म्हणूनच विघ्नहरला उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळाला शेरकर म्हणाले की, मागील वर्षी कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले व 30 केएलपीडीवरुन 100 केएलपीडी क्षमतेने इथेनॉल प्रकल्प सुरु केला व अतिशय यशस्वीपणे या प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉलचे 95 लाख लिटरचे उत्पादन घेतले.
कारखान्याची गाळप क्षमता वाढविणेचे दृष्टिने कारखाना विस्तारीकरणाचे काम अतिशय जोमाने सुरू आहे. कारखान्याने ऊस लागवडीचे धोरण जून-2024 पासून सुरु केले असून कारखान्यामार्फत ऊस विकास अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. या अभियानांर्तगत ऊस उत्पादक शेतकर्यांना उधारी तत्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जात आहे.
ऊस लागवड व कारखान्याकडे उसाची नोंद झालेनंतर प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष ऊस उत्पादकांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करण्यात येते. ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस पिकातील नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व ऊस पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती होणेसाठी कारखाना स्वखर्चाने व्हीएसआय आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी पाठविले जाते.
प्रतिएकरी अधिकाधिक उत्पादन
ऊस उत्पादकांमध्ये प्रति एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्याची भावना वृध्दींगत होण्याकरिता प्रति एकरी 100 ते 110 मे. टन ऊस उत्पादन घेणारे ऊस उत्पादक शेतकरी तसेच प्रतिएकरी 111 मे. टन त्यापुढील ऊस उत्पादन घेणार्या शेतकर्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवुन गौरविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यंदा पाऊस समाधान कारक होत असून शेतकर्यानी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहन शेरकर यांनी केले.




