पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू

ओझर, (वार्ताहर)- जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 11) पहाटे 5 वाजताच्या दरम्यान घडली संस्कृती संजय कोळेकर (वय दीड वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.
मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता. गुरुवारी पहाटे 5 दरम्यान मेंढपाळ झोपेत असताना बिबट्याने हल्ला करून या चिमुरड्या मुलीला शेतात ओढून नेले.
ही बाब लक्षात येताच मेंढपाळाने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना याबाबत कळवले. वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता 8 वाजण्याच्या दरम्यान या चिमुरडीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर आढळून आले.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व पोलीस कर्मचारी तसेच वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेटली आहे.
जुन्नर तालुक्यात वारंवार होणारे मानवी हल्ल्यांमुळे शेतकरी व नागरिक भयभयीत झाले असून शेतामधील पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. प्रशासनाने बिबट्यांचे होणारे मानवी हल्ले लक्षात घेता योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.





