पुणे जिल्हा | शिरोलीत रंगला कुस्त्यांचा आखाडा

ओझर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यांच्या यात्रेची बुधवारी (दि. 10) कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता झाली.
यासाठी नगर संगमनेर, पुणे, धोलवड, ओतूर, जुन्नर, ओझर, नाशिक, पारनेर, चाळीसगाव, बारामती, श्रीरामपूर, हरियाणा येथील मल्लां बरोबरच शालेय व महाविद्यालयीन मुलींनी सुद्धा सहभाग नोंदवला. मुलींच्या कुस्त्या या आखाड्यातला आकर्षणाचा विषय ठरला. आखाड्यातील या कुस्त्यांसाठी जयसिंग थोरवे, वसंत शेरकर, गुलाब थोरवे, सुधीर देवणे , रघुनाथ थोरवे, सचिन थोरवे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, सरपंच प्रदीप थोरवे, माजी सरपंच लक्ष्मण शेरकर, गणेश राऊत, पोलीस पाटील अमोल थोरवे, बाळासाहेब विधाटे, नंदूकाका शेरकर, रामदास थोरवे, विक्रम थोरवे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन विधाटे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे, रामदास बोर्हाडे, गोविंद महाराज देवणे,दत्ता बोर्हाडे, योगेश हांडे, अॅड. संजय उकिर्डे हे होते.
यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे व यात्रेच्या नियोजनात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवल्याबद्दल विक्रम थोरवे यांचा सत्कार करण्यात आला. शेवटची कुस्तीही 11 हजार रुपयाची पिंपळवंडी येथील सुरज फुलमाळी तर हरियाणा येथील कमलेश या दोन मल्लांमध्ये होऊन बक्षिसाची रक्कम विभागून देण्यात आली.





