पुणे जिल्हा | 11 लाख 50 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन

ओझर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने 2023-24 चे गळीत हंगामात 10 लाख 23 हजार 425 टन उसाचे गाळप केले असून 11 लाख 50 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितली.
कारखान्याच्या 2023-24 च्या 38 व्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता शुक्रवारी (दि. 3) करण्यात आली, याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष शेरकर बोलत होते.
यावेळी सुमित्रा शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ सदस्य, ऊस तोडणी कामगार, तोडणी मुकादम, ऊस वाहतूक चालक-मालक कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, हंगामाच्या सांगतेनिमित्त कारखाना कार्यस्थळावर सिव्हील ओव्हरसिअर हर्षल ज्ञानेश घोलप आणि त्यांच्या पत्नी साक्षी हर्षल घोलप या उभयतांच्या हस्ते श्रीसत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चालु वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या एकूण 41 कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि स्मार्टवॉच भेट म्हणून देण्यात येवून यथोचित सत्कार करण्यात आला.
शेरकर म्हणाले की, मागिल वर्षीचे तुलनेत या गाळप हंगामात 1 लाख 19 हजार 64 एवढे गाळप जास्त झाले आहे. गाळप हंगाम यशस्वीरित्ता संपन्न झाल्याबद्दल कामगारांना 10 दिवसांचा पगार बक्षिस म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अरुण थोरवे यांनी केले तर संचालक धनंजय डुंबरे यांनी आभार मानले.
सध्या साखरेला बाजारभाव बरे आहेत. पण त्यामध्ये स्थिरता रहात नाही. लवकरात लवकर साखरेची विक्री करून व्याजाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केंद्र शासनाने निर्यातीवर बंदी घातली आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चांगले आहेत. केंद्र सरकारने साखर निर्यातीस परवानगी दिल्यास कारखान्यांना चांगला फायदा होणार आहे.- सत्यशिल शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखाना
विघ्नहरचा नव्याने 65 केएलपीडी क्षमतेचा महत्त्वकांशी विस्तारीत इथेनॉल प्रकल्प या हंगामात पूर्ण क्षमतेने चालविला गेला असून त्यातून सुमारे 80 ते 90 हजार लिटर प्रतिदिनी क्षमतेने उत्पादन घेतले जात आहे.- भास्कर घुले, कार्यकारी संचालक
महत्त्वाचे मुद्दे
10 लाख 23 हजार 425 टन उसाचे गाळप पूर्ण
11 लाख 50 हजार क्विंटल साखर उत्पादन
साखर उतारा 11.63 टक्के
सहवीज निर्मातीतून 4 कोटी 12 लाख 63 हजार 200 युनिट वीज निर्यात
95 लाख 17 हजार 839 लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन
70 लाख 79 हजार 758 लिटर्स इथेनॉलचे उत्पादन





