Maharashtra Election : काँग्रेसचा सावध पवित्रा ! महाराष्ट्रात निवडणुकीनंतरची रणनीती ठरवण्यासाठी ‘या’ 3 निरीक्षकांची केली नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायच्या आधीच काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. निवडणुकीनंतरची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रासाठी तीन निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
‘या’ 3 नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासह कर्नाटकचे नेते डॉ. जी. परमेश्वरा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आहे.
उमेदवारांना दिल्या ‘या’ सुचना
कांग्रेसच्या वतीने 23 तारखेला रात्री किंवा 24 तारखेच्या सकाळपर्यंत आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निकालानंतर 12 तासात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कळेल असे काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.





