विधान परिषद निवडणुकीत ‘त्या’ 3 आमदारांचे वजन वाढले; कोणाला देणार साथ महायुती की महाविकास आघाडी?

मुंबई : विधानपरिषदेच्या तोंडावर महायुती आणि महाविकासआघाडीकडून मतांच्या जुळवाजुळवीला सुरूवात करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर हितेंद्र ठाकूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीला गेले. विधिमंडळात ही बैठक पार पडली. सध्या विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. त्यामुळे येत्या विधान परिषद निवडणुकीत हे 3 आमदार कोणाच्या बाजूने मतदान करणार याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे.
कोण आहेत ‘ते’ 3 आमदार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने लढवलेल्या तीनही जागा जिंकल्या.राजेश रघुनाथ पाटील (बोईसर), क्षितिज ठाकूर (नालासोपारा) आणि हितेंद्र ठाकूर (वसई) हे नवनिर्वाचित आमदार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांना महत्त्व प्राप्त झालं आहे. हे तीन आमदार आपल्यासोबतच राहावे, यासाठी महायुती आणि महाविकासआघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत. आता हे आमदार कोणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात ?
भाजप
पंकजा मुंडे, परणिय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत
शिवसेना
भावना गवळी, कृपाल तुमाणे
राष्ट्रवादी (अजित पवार)
राजेश विटेकर,शिवाजीराव गर्जे
काँग्रेस
प्रज्ञा सातव
शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर





