#video : भर सभेत उद्धव ठाकरेंनी लावली फडणवीसांची ‘ती’ क्लिप; म्हणाले,”हा नागपूरचा कलंक”; संघालाही केला थेट सवाल

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. याच दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूरमध्ये सभा घेत फडणवीसांवरच हल्लाबोल केला आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एक क्लिप ऐकवत देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक असल्याचा घणाघात केला.
नागपूरमधील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी विचित्र झाली आहे. बोलो तैसा चाले, त्याची वंदावी पावले. अलीकडे देवेंद्र फडणवीस बोलले, ‘मी पुन्हा येईन, असं बोललो होतो. पण, दोघांना घेऊन आलो.’ ते दोघेजण कोण आहेत?” असे म्हणत त्यांनी यावेळी एक ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही. आपत धर्म नाही, शाश्वत नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहू. एकवेळी अविवाहीत राहणं पसंत करेल. पण, राष्ट्रवादीशी युती करणार नाही,’असे म्हणत आहेत.
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद । विदर्भ दौरा । नागपूर – #LIVE https://t.co/LEDp39Joa2
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) July 10, 2023
या क्लिपनंतर उद्धव ठाकरे यांनी, “देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असा घणाघात भाजपावर केला आहे.
पुढे त्यांनी, “देवळात घंटा बडवणारं आमचं हिंदुत्व नाही. पहिली हिंदुत्वाच्या पायावर कुऱ्हाड २०१४ साली भाजपाने मारली आहे. हे हिंदुत्व ज्या दिशेने घेऊन चालले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.





