VIDEO : खुंखार.. भेदक आणि बिग बजेट ! मराठ्यांच्या स्वाभिमासह अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’चा टीजर प्रदर्शित

मुंबई – मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ या चित्रपटाचे रोमांचक टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून बलोचमधील अभिनेता प्रवीण तरडेची जोरदार चर्चा होती. अखेर टीजरमध्ये तरडे यांचा करारी बाणा पाहायला मिळत आहे. सरसेनापती हंबीरराव नंतर तरडे पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारताना यावेळी दिसत आहेत.
टिझरमध्ये चित्रपटाची भव्यता जाणवत असून अंगावर अक्षरशः शहारे उभे राहत आहेत. प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग यावेळी पाहायला मिळणार आहे. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
”पानिपतचा पराभवनानंतर मराठ्यांचे सळसळते रक्त त्यांना शांत बसू देत नव्हते. अन्यायाला, अत्याचाराला सामोरे जात त्यांनी शत्रुला चोख उत्तर दिले. मराठ्यांची हीच विजयगाथा मी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी म्हंटले आहे. टीजरमध्ये चित्रपटातील लोकेशन्स आणि संगीत पाहता चित्रपट बिग बजेट असलयाचे जाणवते.
विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे व्यतिरिक्त अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.





