पुणे | मराठा आणि धनगरांना आरक्षण देणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सध्या आरक्षणासाठी असलेली ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ती ७३ टक्क्यांपर्यंत करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणार आहे. तसेच राज्यातील मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही कॉंंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली.
एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॉंंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, रजनी पाटील, चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी याचे आगमन होताच एकच जल्लोष झाला. तर भाषणाला सुरूवात करतानाच कार्यकर्त्यांचा बब्बर शेर म्हणून उल्लेख केला. कॉंंग्रेसचे उमेदवार धंगेकर यांना व्यासपीठावर पुढे बोलून घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी गांधी म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर देशात आतापर्यंत कोणतीही असे निर्णय घेतले नाहीत, असे क्रांतिकारी निर्णय घेणार आहोत. या देशात १५ टक्के दलित आहेत. पाच टक्के आदिवासी आहेत. तर ५० टक्के ओबीसी आहेत. देशात अति मागासांची संख्या जवळपास ७३ टक्के आहे. परंतु, ५० टक्क्यांच्या कृत्रिम आरक्षण मर्यादेमुळे त्यांना न्याय मिळत नाही.
आम्ही सत्तेत आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची ही कृत्रिम मर्यादा काढून टाकू. तसेच, शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था, हॊस्पिटल, महाविद्यालये, काॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करणार आहोत. त्यावेळी खरी परिस्थिती देशासमोर येईल आणि राजकारणाची दिशाही बदलेल.
महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा इथल्या रक्तात आणि हृदयात नैसर्गिकच आहे. शाहू -फुले-आंबेडकर, गांधी, नेहरू यांची विचारधारा इथल्या नागरिकांच्या रक्तात असून ते कोणी काढू शकणार नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
गांधी यांच्या महत्त्वाच्या घोषणा…
– महिलांना दरवर्षी एक लाख रुपये,
– पदवीधरांसाठी दरवर्षी एक लाख रुपये आणि एक वर्षांची ॲप्रेंटीशिप,
– अंगणवाडी महिलांचे मानधन दुप्पट,
– मनरेगाच्या कमागारांची मजुरी २५० रुपयांवरून ४०० रुपये करणार
एकच टॅक्स…
केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. वेगवेगळे पाच टॅक्स लावले जातात. सध्या, देशात पहिल्यांदाच शेतकर्यांकडून जीएसटीच्या नावाखाली कर घेतला जात आहे. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर जीएसटी बदलवून टाकणार असून एकच टॅक्स असेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
ती रक्कम खूप मोठी…
देशातील ७० टक्के संपत्ती ही फक्त २२ लोकांच्या हातात आहे. या २२ लोकांची १६ लाख कोटी रुपयांची कर्जे मोदी सरकारने माफ केली. परंतु शेतकऱ्यांची कर्जे त्यांनी माफ केली नाही. ही रक्कम पाहिली, तर दरवर्षी या प्रमाणे पुढील २४ वर्षे शेतकऱ्यांची कर्ज माफ होतील. २४ वर्षे मनरेगाला पैसे देता येतील. एवढी मोठी ही रक्कम आहे. या २२ लोकांकडे जेवढे धन आहे, तेवढे ७० हजार कोटी लोकांकडे असल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले.




