Video : आधी अश्रूंचा पूर.. मग नोटांचा पाऊस; अमेरिकेतली अंत्ययात्रा ठरली चर्चेत, चक्क हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस

America | viral video : तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये आकाशातून पैशांचा पाऊस पडताना पाहिले असेल, पण हे खरोखरच अमेरिकेतील डेट्रॉईटमधील ग्रॅटिओट अव्हेन्यू कॉनर स्ट्रीटवर घडले. खरंतर, येथे कारवॉश मालक डॅरेल थॉमस यांना अंतिम निरोप देण्यात येत होता.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी अनेक लोक जमले होते. यावेळी अचानक हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्यांसह नोटांचा वर्षाव करण्यात आला. आणि पैश्याचा पाऊस सुरु झाला.
‘डॅरेल थॉमस’ हे ५८ वर्षांचे होते आणि ते कारवॉश कंपनी चालवत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अल्झायमर होते. मरण्यापूर्वी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की जेव्हा त्यांचा अंत्यसंस्कार होईल तेव्हा आकाशातून पैशांचा वर्षाव व्हावा.
म्हणून जेव्हा त्यांना दफन केले जात होते तेव्हा हेलिकॉप्टरमधून रोख रक्कम खाली पडली. वर्षाव केलेली रक्कम सुमारे ५ हजार डॉलर्स असल्याचे सांगितले जाते, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ४ लाख ३० हजार रुपये आहे.
वाहतूक थांबली, लोक पैसे लुटू लागले…
आश्चर्य म्हणजे, पैशांचा पाऊस सुरू होण्यापूर्वी डॅरेलच्या मृत्यूवर शोक करणाऱ्या लोकांनी आकाशातून पैसे पडताना पाहताच ते लुटण्यासाठी धाव घेतली. रोख रक्कम लुटण्यासाठी काही लोकांमध्ये भांडण झाले. रस्त्यावरील वाहतूक थांबली आणि लोकांनी त्यांच्या गाड्यांमधून खाली उतरून पैसे लुटले.
याबद्दल शहर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती, त्यांना फक्त हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्या टाकण्याची परवानगी मागितली गेली होती.
डॅरेलला समाजाला काहीतरी परत द्यायचे होते…
द सनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, डॅरेलचा मुलगा स्मोक याने सांगितले की, त्याचे वडील रस्त्यावर पैशांचा पाऊस पाडून त्यांच्या समुदायाला काही पैसे परत देऊ इच्छित होते. डॅरेलची भाची क्रिस्टल पेरी हिने पुष्टी केली की एकूण $५,००० दान करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या मुलानेही काही रक्कम योगदान दिली.
दरम्यान, जेव्हा आकाशातून पैशांचा पाऊस पडला तेव्हा कार वॉशची कर्मचारी लिसा म्हणाली की, सर्वांना काही पैसे मिळाले. लोक लुटण्यासाठी धावले, पण भांडण झाले नाही.
यापूर्वी, पाकिस्तानमध्येही असे दृश्य दिसले होते जेव्हा एका व्यक्तीने त्याच्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांवर पैशांचा पाऊस पाडला. ही घटना पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद शहरातील आहे.





