#video : रुग्णवाहिका चालकाने जखमी असलेल्या रुग्णाला पाजली दारू अन् नंतर स्वतःही घेतले दोन घोट; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : ओडिशामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक रुग्णवाहिका चालक त्याच्या सोबत असणाऱ्या जखमी रुग्णाला दारु पाजत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जखमी रुग्णाला रुग्णालयात लवकर घेऊन जाण्याऐवजी गाडी बाजूला घेऊन रुग्णासह स्वतः देखील दारू पीत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिरतोल येथे या रुग्णवाहिका चालकाने सुरुवातीला गाडी महामार्गाच्या बाजूला पार्क केली. त्यानंतर त्याने स्वत:साठी आणि रुग्णवाहिकेमध्ये मागील बाजूस जखमी अवस्थेत असलेल्या रुग्णासाठी दोन ग्लास तयार केले. त्यानंतर हा चालक हे त्या ग्लासमधून दारु पीत असताना दिसत आहे. नंतर रुग्णवाहिकेमध्ये मागील बाजूच स्ट्रेचरवर असलेला रुग्ण आडवा पडूनच ग्लासातील दारु पिताना दिसत आहे.
In a shocking incident that took place in #Odisha #india ,a video of an ambulance driver drinking with a patient while on their way to hospital. In the video, the ambulance driver can be seen drinking and even sharing the drink with a patient. pic.twitter.com/gNJ07tECV6
— S a m (@cheguwera) December 20, 2022
हा सारा प्रकार रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीने शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा चालकाला जाब विचारला तेव्हा चालकाने रुग्णानेच दारुची मागणी केली होती असे सांगितले. या रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाबरोबर एक महिला आणि लहान मूलही दिसून येत आहे.
जगतसिंहपूर जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. क्षेत्रबासी दास यांनी “ही खासगी रुग्णवाहिका असल्याने आम्ही याबद्दल फार काही होलू शकत नाही. मात्र या चालकाविरोधात आरटीओ आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे,” असे म्हटले आहे.





