Rain in Vidarbha : विदर्भालाही पावसाने झोडपलं! पैनगंगा नदीला पूर; सोयबीन हळदीचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळित

Rain in Vidarbha : पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत आधीच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अशातच आता विदर्भालाही पावसाने झोडपलं आहे. गुरुवापासूनच विदर्भ, मराठवाडा आणि खान्ददेशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुटुंब भरून वाहून लागले आहेत. यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती समोर आली आहे.
पैनगंगा नदीला पूर
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आला आहे. नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने सोयाबीन, हळद यांसारखी पीके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याला देखील पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. हजारो हेक्टर शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग
सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकाच्या दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जनजीवन विस्कळित
मुसळधार पावसाचा फटका हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना देखील बसला आहे. पैनगंगा नदीच्या पूरामुळे शेतामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे सोयाबीन हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्याला मोठी चिंता लागलेली आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
आज २७ जून रोजी हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांना अॅारेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच येथील घाटमाध्यावर जोरदार पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. याशिवाय उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.





