Maharashtra School: उन्हाळाच्या सुट्ट्यानंतर आता शाळा कधीपासून सुरु होणार? १५ जून की २२ जूनला…
Maharashtra School: विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांमधील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार

Maharashtra School: उन्हाळाच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा कधीपासून सुरू होणार? याबाबतचा स्पष्ट निर्णय देण्यात आला आहे. आता विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू केल्या जाणार असून, तर उर्वरित राज्यभरातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार आहेत.
तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील शाळांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.
कडक उन्हामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार आहेत. विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी सोमवारी २२ जून रोजी सुरू होतील. तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून रोजी नियमित वेळापत्रकानुसारच सुरू होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत संदर्भ क्र. २ अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवारी १५ जून, २०२६ पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.’
विदर्भाचे तापमान विचारात घेऊन निर्णय
तर विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत आणि विदर्भातील सध्याच्या भीषण हवामानाचा विचार करून शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अद्यापही विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार २२ जून, २०२६ पासून सुरू होतील.
तसेच २२ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरतील. जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेत भरतील. तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांमधील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार म्हणजेच सोमवार १५ जून २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील’, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:
Satara: व्यापारी पेठांतील अतिक्रमण हटविण्याचे आव्हान; सातारा पालिका ॲक्शन मोडमध्ये





