महागड्या रिचार्जमुळे सिम कार्ड बंद करताय? ‘या’ कंपनीने लाँच केले स्वस्त प्लॅन्स; किंमत 150 रुपयांपेक्षा कमी

Affordable Recharge Plans Under 150 Rs. : मोबाईल नंबर सुरू ठेवण्यासाठी दरमहिन्याला रिचार्ज करावे लागते. मात्र, रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढल्याने दोन सिम कार्डसाठी दरमहिन्याला पैसे खर्च करणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vi) दोन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत.
व्हीआयच्या या दोन्ही रिचार्ज प्लॅनची किंमत 150 रुपयांपेक्षा कमी आहे. या दोन्ही रिचार्ज प्लॅन्सची किंमत 128 आणि 138 रुपये आहे. व्हीआयच्या या दोन्ही रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Vi चा 128 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vi च्या 128 रुपयांच्या स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 18 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 100 एमबी डेटा दिला जातो. तसेच, 2.5 पैसे प्रति सेकंद यानुसार कॉलिंगची सुविधा मिळेल.
ग्राहकांना रात्रीच्या कॉलिंगसाठी 10 लोकल मिनिट्स मोफत दिले जातात. याचा फायदा ग्राहक रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये यूजर्सला मोफत एसएमएसची सुविधा मिळत नाही.
Vi चा 138 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vi च्या ग्राहकांना 138 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये 100 एमबी मोबाइल डेटाचा लाभ मिळेल. यासोबतच, 10 ऑन-नेट नाइट मिनट्स आणि 2.5 पैसे प्रति सेकंद यानुसार कॉलिंगची सुविधा मिळते. लक्षात घ्या की, 10 लोकल कॉलिंग मिनिट्सचा वापर केवळ रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा करता येईल. या स्वस्त प्लॅनमध्ये एसएमएसची सुविधा दिली जात नाही.
व्हीआयच्या या दोन स्वस्त प्लॅन्समध्ये दोन सिम कार्ड वापरणाऱ्या यूजर्सला फायदा मिळेल. मात्र, लक्षात घ्या की, सध्या कंपनीने हे प्लॅन्स काही ठराविक ठिकाणीच लाँच केले आहेत. त्यामुळे रिचार्ज करण्याआधी तुमच्या मोबाइल क्रमांकासाठी हे प्लॅन्स उपलब्ध आहेत की नाही हे पाहा.





