नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचे आवाहन

नागपूर : नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली. या हिंसाचारात काही पोलिसही जखमी झाले आहेत. नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक म्हणाले की, ही घटना काही गैरसमजामुळे घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच वेळी, कलम १६३ अंतर्गत अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सकाळी औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व् हिंदू परिषद आणि बजरंग दलाने येथे निदर्शने केली होती. त्यानंतर संध्याकाळी जमावाने भालदारपुरा येथे दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केली. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले. काही पोलिसदेखील जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचे आवाहन
या प्रकारानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुख:त सहभागी होणारे शहर आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.
हिंसाचारामागे कट : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या घटनेत डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. कुऱ्हाडीने हल्ला कसा करण्यात आला? या जाळपोळ आणि हिंसाचारामागे काही कट आहे का? असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न : अंबादास दानवे
अंबादास दानवे म्हणाले आहेत की, गेल्या काही दिवसांपासून राज्याचे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच असं वातावरण चिघळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे राज्यात हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण होईल. हिंदूंच्या मनात वेगळी भीती, मुस्लीमांच्या मनात वेगळी भीती निर्माण होऊन दंगल होईल, राज्य सरकार स्वतःच्या या उद्दिष्टात यशस्वी झालं आहे. पण जनतेने, ज्यात हिंदू असतील किंवा मुस्लीम असतील, त्यांनी सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये. आपण शांतता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आत्तापर्यंत ८० जणांना अटक
नागपूरमध्ये पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कलम १६३ लागू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी ८० जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच अनेक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली आहे, असे नागपूर पोलिसांनी सांगितले.
महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
या घटनेनंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.





