Velhe News : वेल्ह्यात ‘महिला राज’ची नांदी! सभापती पदाच्या आरक्षण सोडतीने दिग्गजांचे गणित बिघडले

प्रभात वृत्तसेवा
विंझर – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांची गुरुवारी जाहीर केलेल्या पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षण सोडतीमुळे वेल्हे (राजगड) तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेल्हे पंचायत समितीचे सभापतीपद यावेळी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक सध्याच्या राजकीय दिग्गजांचे सभापती बनण्याचे स्वप्न भंगले असून, आता या पदासाठी नवीन महिला चेहऱ्यांचा शोध सुरू झाला आहे.
आरक्षणाची माहिती ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, वेल्हे पंचायत समितीचे सभापती पद ‘सर्वसाधारण महिला’ या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. आता अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांना या पदापासून दूर रहावे लागणार आहे. आरक्षण जाहीर होताच, तालुक्यातील राजकीय गोटात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. या निर्णयामुळे वेल्हे तालुक्यात राजकीय संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सक्षम महिला उमेदवारांचा शोध सुरु..
आरक्षणामुळे सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याकडून आता नवीन सक्षम महिला उमेदवारांचा शोध युद्धपातळीवर सुरू झाला आहे. कोणत्या गटातून कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे काही ज्येष्ठ इच्छुक उमेदवारांनी या आरक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे, परंतु पक्षाचा आदेश अंतिम असल्याने त्यांना आता पडद्याआड राहून आपल्या पत्नीला किंवा कुटुंबातील महिला सदस्याला संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
राजकीय बैठकांचे सत्र सुरू..
या आरक्षणामुळे कोणत्या गटाचे वजन वाढणार आणि सत्तेची समीकरणे कशी बदलणार, याबद्दल वेल्हे (राजगड) तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. अनेक विद्यमान आणि आजी-माजी सदस्यांच्या घरांमध्ये राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. एकंदरीत, वेल्हे पंचायत समिती सभापती पदाच्या महिला आरक्षणामुळे राजगडच्या राजकारणात अनपेक्षित बदल झाले आहेत. आता वेल्ह्याच्या राजकारणाची धुरा कोणत्या महिला नेत्याच्या हाती येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.वेल्हे पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाबद्दल शिवसेना वेल्हे तालुका प्रमुख उमेश नलावडे यांनी आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महिला आरक्षणाचे स्वागत करत, शिवसेना (ठाकरे गट) वेल्हे तालुक्यात सर्वात जास्त प्रबळ असल्याचा दावा केला आहे.
”अजित पवार गटाशिवाय तालुक्याच्या विकासाला पर्याय नाही. तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा एकमेव पर्याय आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. तालुक्याचा भौगोलिक आणि विकासविषयक हेतू साध्य करायचा असेल, तर अजित पवारांच्या गटाचे सर्व लोक तालुक्यातून निवडून आले पाहिजेत. जर तालुक्याला गतवैभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णकाळ पुन्हा आणायचा असेल, तर या पर्यायाशिवाय गत्यंतर नाही.”
-अमोल नलावडे (मा. जि. प., सदस्य )
”भारतीय जनता पक्ष हा नेहमीच महिलांना योग्य आणि सन्मानाचे स्थान देणारा पक्ष राहिला आहे. आमच्या पक्षाने नेहमीच महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्याच विचाराने आम्ही भविष्यातही काम करत राहू. या निवडणुकीबद्दल अधिक भाष्य करताना, आम्ही लोकशाही प्रक्रिया आणि स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाचा आदर करतो.”
-राजूभाऊ रेणुसे (भाजपा, वेल्हे तालुका, अध्यक्ष)
’सर्व जागा लढणार, पूर्ण तयारीने सामोरे जाऊ’
”वेल्हे पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी जी महिला आरक्षणाची सोडत (जाहीर) झाली आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पूर्ण ताकदीने आणि तयारीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सर्वच्या सर्व जागा (निवडणुका) लढवणार आहोत. वेल्हे तालुक्यातील नागरिकांचा विकास आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे कटिबद्ध आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत आम्ही प्रबळ दावेदारीसह मैदानात उतरू.”
– संतोष (आप्पा ) दासवडकर (मनसे, पुणे जिल्हा, अध्यक्ष)





