ऐतिहासिक वारसा लाभलेले पेठ गावातील ‘वीरगळ’

पेठ – येथील श्री वाकेश्वर मंदिराच्या परिसरात एक वीरगळ आहे. परंतु हा नेमका काय प्रकार आहे , हे बऱ्याच जणांना माहित नसते. ह्या वीरगळाला देव समजून शेंदूर लावला आहे. इतिहास”म्हणजे नक्की काय ? आजच्या काळात बऱ्याच जणांना राजा, राणी, लढाई, युद्ध,शस्त्रे, तह हे सर्व म्हणजेच इतिहास असे वाटते.परंतु, इतिहास ही खूपच व्यापक अशी ज्ञानशाखा आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे शिलालेख आणि शिलालेखाचाच एक प्रकार म्हणजे “वीरगळ”.
वीरगळाला इतिहासात विशेष महत्त्व आहे. वीरगळ म्हणजे स्थानिक प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रतिक आहे. युद्धामध्ये लढाई करत असताना वीरमरण आलेल्या वीरांची स्मृती म्हणून उभट शिळेवर जे विशिष्ट आशयाचे शिल्प कोरले जाते, त्याला वीरगळ म्हणतात. वीर हा संस्कृत शब्द आहे. तर गळ (म्हणजे दगड) हा कन्नड शब्द आहे. या अर्थानेच वीरांचा जो दगड किंवा शिळा आहे, त्याला वीरगळ म्हणतात.
मराठीत “वीरगळ” इंग्रजीत हिरो स्टोन”Hero stone”आणि भारतातील वेगवेगळ्या भागांत यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. परंतु, त्यांचा मूळ आशय हा सर्वत्र सारखाच असतो. वीरगळाची रचना ही प्रामुख्याने आयताकृती ,उभट आणि वरती घुमट अशी असते. वीरगळाचे पाच किंवा तीन भागांत विभाजन केलेले असते.
पहिल्या भागामध्ये योद्धा कैलास पर्वतावर जाऊन शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे कोरलेले असते. दुसऱ्या भागामध्ये योद्धयाचा मृत्यू झाला असून तो देवदूतांबरोबर स्वर्गात जात असल्याचे कोरलेले असते, तर तिसऱ्या भागामध्ये वीर योद्धा युद्धामध्ये लढत आहे, असे कोरलेले असते. वीरगळ हे फक्त भारतातच नाही तर जगभर आढळून येतात. यावरून हे खूप प्राचीन आहेत हे समजते. आज ज्याप्रमाणे देशासाठी, समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे सैनिक पुढील पिढीला कळावेत, म्हणून त्यांचे स्मारक उभारले जाते. त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून वीरांचा विरगळीच्या माध्यमातून सन्मान करण्याची ही एक पद्धत आहे.





