“वीर सावरकर हे भाजपचे आणि आरएसएसचे श्रद्धास्थान कधीच नव्हते…”

मुंबई – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपसह मनसेने देखील राहुल गांधींच्या विधानावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राहुल गांधींच्या विधानावर भाष्य केलं आहे.यावेळी वीर सावरकर भाजप तसेच आरएसएसचे श्रद्धास्थान नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी यावेळी केला.
सावरकरांची बदनामी त्यांच्याविरोधात चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही असं स्पाष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. सावरकर हे भाजपचे आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते हा इतिहास आहे असंही ते यावेळी म्हणाले. तसेच भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना वीर सावरकरांचा मुद्दा समोर आणण्याची गरज नव्हती त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडू शकते असा इशारा राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करण आम्हाला मान्य नाही असं म्हणत माध्यमांशी संवाद साधत राऊत यांनी काँग्रेस आणि सावरकर यांच्यातील वादाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींच्या यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात देखील मोठा प्रतिसाद आहे अशात राहुल गांधींनी हा विषय काढण्याची गरज नव्हती असं राऊत यावेळी म्हणाले. इतिहासात काय घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावला.





