Vasundhara Raje : राजस्थानात नेतृत्वबदलाचे संकेत? वसुंधरा यांनी घेतली मोदींची भेट

जयपूर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने राज्याच्या राजकारणात अचानक खळबळ निर्माण झाली असून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, राजे यांच्या भेटीनंतर आता विद्यमान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची दिल्ली भेट देखील चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटींबद्दल राजकीय चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. त्यावरून विविध क्षेत्रातून दावे केले जात असून राज्यातील नेतृत्वबदलाचे हे संकेत मानले जात आहेत.
वसुंधरा राजे यांनी संसद भवनातील त्यांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर त्या खूप आनंदी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या २४ तासांत वसुंधरा राजे यांनी इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेल्या १२ पोस्ट पुन्हा पोस्ट केल्या आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड हे देखील गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत.
वसुंधरा राजे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर काही वेळातच, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील दिल्लीला रवाना झाले. त्यांचा दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम अचानक ठरला, हे विशेष. भजनलाल शर्मा यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, सीआर पाटील आणि मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेही नवी दिल्लीत राहणार आहेत. वसुंधरा राजेही दिल्लीत आहेत. दरम्यान, रविवारी (२८ जुलै) नवी दिल्लीत राजस्थानबाबत भाजपची मोठी बैठक झाल्याची चर्चा आहे. ही बैठक संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे कळले आहे. या बैठकीत राजस्थानचे प्रभारी राधा मोहन दास अग्रवाल देखील उपस्थित होते.





