पुणे : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेईना. एकीकडे शिंदे गटाचा दबदबा वाढत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाची पडझड होताना दिसत आहे. यादरम्यान महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने पुण्याच्या फायरब्रँड नेत्याला ठाकरे गटाने प्रमोशन दिलं आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तात्यांनी मनसेला डिवचलं वसंत मोरे यांनी मनसेसाठी जे ऑफिस निवडलं त्याच ऑफिसबाहेर बॅनरबाजी करून वसंत मोरे यांनी मनसेला डिवचलं. वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मनसे कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावले. ‘आता भगवा फडकवणारच’ म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला इशारा दिला. सध्या या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा राजीनामा दिला अन् वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली. पण वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता त्यांना ठाकरे गटात ही मोठी जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. 5 माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने आता ठाकरे गटासमोर अनेक प्रश्न उपस्थित आहेत. त्यातच आता पुण्यात ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी वसंत मोरे यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वसंत मोरे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय जलवा दाखवतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.