ICC ODI Rankings : वरुण चक्रवर्ती वनडे क्रमवारीत चमकला! तब्बल १४३ स्थानांची घेतली मोठी झेप

ICC ODI Bowling Rankings Updates : आयसीसीने ५ मार्च रोजी लेटेस्ट एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद शमीच्या मानांकनावर सर्वांच्या नजरा खिळल्या असताना वरुण चक्रवर्तीने सर्वात मोठी झेप घेतली आहे. त्याने तब्बल १४९ स्थानांची मोठी झेप घेत टॉप-१०० मध्ये एन्ट्री मारली आहे.
वरुण चक्रवर्तीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यात त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. यातील न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याला २ विकेट्स घेण्यात यश आले. चक्रवर्ती व्यतिरिक्त, शमीला देखील लेटेस्ट आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
वरुण चक्रवर्तीची एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप –
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या २ गट सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माने खेळवले नव्हते. परंतु, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चक्रवर्तीला संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीतही चक्रवर्तीने ट्रॅव्हिस हेडची मोठी विकेट घेतली. वरुण चक्रवर्तीने लेटेस्ट एकदिवसीय क्रमवारीत १४३ स्थानांची मोठी झेप घेत ३७१ रेटिंग गुणांसह ९६व्या स्थानावर पोहोचला आहे.
मोहम्मद शमीने तीन स्थानांनी घेतली झेप –
वरुण व्यतिरिक्त, मोहम्मद शमीने देखील लेटेस्ट आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली आहे, ज्यामध्ये तो आता ६०९ रेटिंग गुणांसह ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला आतापर्यंत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून अपेक्षित प्रभाव दाखवता आलेला नाही. कुलदीपने लेटेस्ट गोलंदाजांच्या क्रमवारीतही तीन स्थानांनी घसरला आहे, ज्यामध्ये तो आता ६३७ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर अक्षर पटेलने ७ स्थानांनी झेप घेतली आहे आणि ४९९ रेटिंग गुणांसह ४० व्या स्थानावर पोहोचला आहे.





