Ind vs ENG: 5 विकेट्स घेत वरूण चक्रवर्ती सामन्यात चमकला, मात्र ‘या’ नकोशा विक्रमाची झाली नोंद

IND vs ENG 3rd T20I: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाही व भारताचा 26 धावांनी पराभव झाला. भारताचा पराभव झाला असला तरी 5 सामन्यांच्या मालिकेत संघ 2-1 ने आघाडीवर आहे.
या सामन्यात भारताकडून वरूण चक्रवर्तीने चमकदार कामगिरी करत 5 विकेट्स घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. मात्र, यासोबतच, त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
एकाच सामन्यात वरूणच्या नावावर दोन विक्रमांची नोंद झाली. वरूणने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 24 धावा देत 5 विकेट्स घेतले. तो या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यासोबतच, इंग्लंड-भारतामधील टी20 मालिकेत सर्वाधिक 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी दोन्ही संघांमधील मालिकेत सर्वाधिक 8 विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता.
वरूणने आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोनदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मात्र, या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. अशाप्रकारे, वरुण पहिला गोलंदाज बनला आहे, ज्याने दोनदा 5 विकेट्स घेतल्या आणि दोन्ही वेळा त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या आधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना 17 धावा देत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. या सामन्यातही भारताचा 3 विकेट्सने पराभव झाला होता.
दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा 26 धावांनी पराभव झाला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत 145 धावांपर्यंतच मजल मारू शकला.





